एसटीचा बेस्ट प्रशासनाला आधार, ५० बस रस्त्यावर धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 12:59 AM2020-10-01T00:59:49+5:302020-10-01T01:00:09+5:30
चाकरमान्यांच्या मदतीला लालपरी : ५० बस रस्त्यावर धावणार
ठाणे : कोरोनाच्या काळात एसटीने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यातील जनतेला मोठा आधार देण्याचे काम केले आहे. मुंबईकरांची धमणी म्हणून गौरविल्या जाणाऱ्या बेस्टलाही एसटीनेच आधार दिला आहे. राज्य परिवहन प्रशासनाने २०० एसटी बेस्टच्या मदतीला उतरवून प्रवाशांची वाहतूक सुरू केली आहे. ठाण्यातूनही एसटीने बेस्टला ५० बस पुरविल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये रेल्वेसह सर्व वाहतूक सेवा बंद असताना एसटीने जनतेला आधार देऊन त्यांना त्यांच्या राज्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. एसटीचालकांनी लोकांना घेऊन थेट बांगलादेश, पाकिस्तान यासारख्या देशांच्या सीमादेखील गाठल्या. शिवाय, भाजीपाला, अन्नधान्याचीदेखील वाहतूक केली. कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचवण्याचे कामसुद्धा एसटी करीत आहे. आता मागणी केल्याप्रमाणे एसटीने बेस्टला २०० गाड्या, ४०० चालक-वाहक पुरविले आहेत. मंगळवारपासून एसटीने हे बळ दिले आहे. ठाण्यातील खोपट, वंदना येथूनही ५० एसटी दिल्या असून त्या मुलुंड ते वरळी, शिवडी अशी प्रवासी वाहतूक करणार आहेत. प्रवाशांसाठी बेस्टचे तिकीट देण्यात येणार आहे. तर, चालक, वाहक एसटीचे असून त्याबदल्यात एसटी प्रशासनाला प्रतिकिलोमीटर अंतरासाठी ७५ रु पये मोबदला दिला जाणार आहे.
ठाण्यातून ५० बस दिल्या असून खोपट, मुलुंड येथून त्या सोडल्या जाणार आहेत. गुरु वारपासून ४५ बस बेस्टला हस्तांतरित केल्या आहेत. चालक, वाहक आणि गाडी महामंडळाची असणार आहे. सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.
- विभागीय नियंत्रक
अधिकारी, ठाणे