लॉकडाऊनमध्ये चोरी करणारे अट्टल चोरटे जेरबंद: ३४ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 01:04 AM2020-04-29T01:04:11+5:302020-04-29T01:18:56+5:30
गोदाम फोडून एलसीडी टीव्ही संच आणि मोबाईलसह काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरटयांना ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. त्यांच्याकडून नामांकित कंपनीचे २५१ मोबाईल तसेच एलसीडी टीव्ही संच असा ३४ लाख ६९ हजार ४३९ रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळातही भिवंडीतील वडपा येथील एका लॉजिस्टिक कंपनीचे गोदाम फोडून एलसीडी टीव्ही संच आणि मोबाईलसह काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची चोरी करणाºया यश डोंगरे (रा. अंबाडी) आणि योगेश पाटील (रा. परशुरामपाडा, भिवंडी) या दोघांना ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. त्यांच्याकडून नामांकित कंपनीचे २५१ मोबाईल तसेच एलसीसीडी टीव्ही संच असा ३४ लाख ६९ हजार ४३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोघांनाही ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
लॉकडाऊनमुळे पोलीस बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याची संधी साधत भिवंडी तालुक्यातील वडपा भागातील जी कॉम लॉजिस्टीक प्रा. लि या एलजी कंपनीच्या गोदामाचे पाठीमागील शटर उचकटून चोरटयांनी 40 लाख 50 हजार 935 रु पयांचा ऐवज चोरल्याची घटना २१ एप्रिल रोजी घडली होती. यामध्ये प्रत्येकी एक लाखांच्या तीन एलसीडींचा आणि नामांकित कंपन्यांच्या २५१ मोबाईलचा समावेश होता. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. एकीकडे लॉकडाऊनमुळे गुन्हयांमध्ये घट झाली असतांनाच चोरटयांनी गोदामावर इतका मोठा डल्ला मारल्याने पोलीस वर्तूळात आणि व्यापाऱ्यांमध्येही चांगलीच खळबळ उडाली होती. याची गंभीर दखल घेत ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राम भालिसंग यांना समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. गोदाम परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याचदरम्यान, यश डोंगरे आणि योगेश पाटील (रा. दोघेही भिवंडी) हे दोघेही या चोरीच्या आदल्या दिवशी ‘वडप्यातील गोदामात काम वाजवायचे आहे’ अशा गप्पा मारीत होते, अशी टीप एका खबºयाकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस नाईक हनुमंत गायकर यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे यांच्या पथकाने तातडीने डोंगरे आणि पाटील या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना बोलते केल्यानंतर त्यांनी या चोरीची कबूली दिली. पाटील याच्या परशुरामपाडा येथील जुन्या घरात लपविलेले चोरीतील २५१ मोबाईलसह सर्व ३४ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल तसेच चोरीसाठी वापरलेले वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे तीन गुन्हे दाखल आहेत. हा गुन्हा उघड करण्यासाठी गणेशपूरी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लोंढे, पोलीस उपनिरीक्षक गणपत सुळे, पोलीस हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, प्रविण हाबळे, पोलीस नाईक हनुमंत गायकर, उमेश ठाकरे, सतिश कोळी आणि पोलीस कॉन्स्टेबल रवी राय यांनी विशेष प्रयत्न केले.