अनैतिक संबंधामध्ये अडसर, प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 10:14 PM2017-10-15T22:14:27+5:302017-10-15T22:14:45+5:30

सलीम कामधंदा करत नव्हता. दारूच्या आहारी गेल्यामुळे तो तिला नेहमीच मारहाणही करीत होता. त्यातच टांगेवाल्याशी तिचे संबंध जुळल्याचाही त्याला राग होता.

Stuck in immoral relations, husband's blood with the help of a lover | अनैतिक संबंधामध्ये अडसर, प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून

अनैतिक संबंधामध्ये अडसर, प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून

Next

ठाणे : अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरत असलेल्या आपल्याच पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणा-या रुकय्या सलीमबहादूर खान (२६) या पत्नीला तसेच शरीफ शेख (३२) आणि धनराज चव्हाण (२०, रा. दोघेही कळवा, ठाणे) अशा तिघांना कळवा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली आहे. त्यांच्या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पती सलीमबहादूर याने आत्महत्या केल्याचा शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास तिने कांगावा केल्यामुळे तशी फिर्याद कळवा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. मात्र, तक्रार दाखल झाल्यानंतर सलीमचा मृतदेह कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. तिथे उत्तरीय तपासणीमध्ये मृत्युपूर्वी त्याला मारहाण झाल्याचेही उघड झाले.

छातीत अंतर्गत रक्तस्राव तसेच गळा आवळल्याच्या खुणाही याच अहवालात स्पष्ट झाल्या. या अहवालाचा पोलिसांनी सखोल तपास करण्यासाठी रुकय्याला शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतले. तिच्याकडे ‘खास शैलीत’ चौकशी केल्यानंतर सुरुवातीला आपण काहीच केले नसल्याचा आव आणणा-या रुकय्याने नंतर मात्र या खुनाची कबुली दिली. सलीम कामधंदा करत नव्हता. दारूच्या आहारी गेल्यामुळे तो तिला नेहमीच मारहाणही करीत होता. त्यातच टांगेवाल्या शरीफ शेखशी तिचे संबंध जुळल्याचाही त्याला राग होता. यातूनच दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते.

आता सलीमचा कायमस्वरूपी काटा काढण्यासाठी तिने शरीफसह आणखी दोघांच्या मदतीने १४ आॅक्टोबर रोजी खून केला. शरीफ आणि त्याचा नोकर धनराज चव्हाण तसेच आणखी एक जण अशा तिघांनी सलीमचा मारहाणीनंतर ओढणीने गळा आवळून खून केला. नंतर, त्याचा मृतदेह घरात फाशी घेतलेल्या अवस्थेत पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान लटकवून ठेवला. याचीच नंतर रुकय्याने चाळीत बोंबाबोब करत पतीने आत्महत्या केल्याचा कांगावा केला. याप्रकरणी रुकय्या, शरीफ आणि धनराज या तिघांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, अशोक उतेकर आणि तुकाराम पावले यांच्या पथकाने अटक केली आहे.

Web Title: Stuck in immoral relations, husband's blood with the help of a lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.