विद्यार्थ्यांचा वॉटर पार्कमध्ये मृत्यु: नालासोपाऱ्याच्या शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 07:00 PM2019-01-13T19:00:52+5:302019-01-13T19:21:07+5:30
ठाण्याच्या सूरज वॉटर पार्कमध्ये सहलीसाठी आलेल्या दिपक गुप्ता (१५) याच्या मृत्युप्रकरणी नालासोपारा येथील नवजीवन शाळेच्या मुख्यध्यापकांसह सहलीच्या आयोजक शिक्षकांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात हलगर्जी आणि निष्काळजी केल्याचा आरोप करीत दयानंद गुप्ता यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे शालेय व्यवस्थापन चांगलेच अडचणीत आले आहे.
ठाणे: नालासोपारा येथून ठाण्याच्या सूरज वॉटर पार्कमध्ये सहलीसाठी आलेल्या दिपक गुप्ता (१५) या दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यु झाला आहे. त्याच्या मृत्युस नालासोपारा येथील नवजीवन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि सहलीचे आयोजक शिक्षक जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात दिपकचे आजोबा दयाराम गुप्ता यांनी शनिवारी तक्रार दाखल केली आहे. हा तपास आता कासारवडवली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
नवजीवन शाळेचे १३ शिक्षक हे २५० विद्यार्थ्यांना घेऊन ११ जानेवारी २०१९ रोजी ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील सूरज वॉटर पार्कमध्ये आले होते. यासाठी शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याकडून ७०० रुपये शुल्कही आकारले होते. सायंकाळी ५ वा. च्या सुमारास अचानक गुप्ता कुटूंबियांना दिपकला एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. तिथे आजोबा दयाराम यांच्यासह गुप्ता कुटूंबीय पोहचल्यानंतर त्याच्या मृत्युची खबर त्यांना रुग्णालयात समजली. त्याचा मृत्यु दुपारी १२.३० वा. च्या सुमारास सूरज वॉटर पार्कच्या पाण्यात बुडून झाला असून त्यास नवजीवन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि शैक्षणिक सहलीचे आयोजक शिक्षक तसेच इतर जबाबदार आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे चंद्रकांत गुप्ता यांच्या एकूलत्या एक मुलाचा अर्थात आपल्या नातवाचा मृत्यु झाल्याचा आरोप दयाराम गुप्ता यांनी तुळींज पोलीस ठाण्यात १२ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. एकीकडे शाळा व्यवस्थापनाने त्याचा मृत्यु हह्दयविकाराने झाल्याचे कासारवडवली पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. तर दूसरीकडे शाळेय शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे नातवाचा बुडून मृत्यु झाल्याचा आरोप आजोबांनी केल्यामुळे शालेय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. पी. पवार हे अधिक तपास करीत आहेत.