आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 07:08 AM2024-10-03T07:08:45+5:302024-10-03T07:08:53+5:30
शाळा प्रशासन, पुरवठादार दोषी! कळव्यातील विषबाधाप्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा; तक्रारीनंतर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळवा परिसरातील सहकार विद्यालयात ४५ विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणात शाळा प्रशासन आणि पोषण आहार पुरवणाऱ्या पुरवठादारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पालकांच्या तक्रारीनंतर कळवा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला. तक्रारीमध्ये मात्र कोणाची नावे टाकण्यात आलेली नाहीत, अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली.
कळवा सह्याद्री परिसरातील सहकार विद्या प्रसारक मंडळ या खासगी अनुदानित शाळेत मंगळवारी मटकीची आमटी आणि भात खाऊन ४५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. पालिकेच्या कळवा रुग्णालयात सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. कळवा पोलिसांनी पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून शाळा प्रशासन आणि पुरवठादार याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली.
शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे पाहणी दौऱ्यासाठी मध्यरात्री दोन वाजता आल्याने औषधोपचार घेऊन झोपेत असलेल्या विद्यार्थ्यांना उठविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. मंत्री येणार असल्याने पालिका अतिरिक्त आयुक्त, शिक्षणाधिकारी, रुग्णालय प्रशासन आणि सहकार विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेतील व्यवस्थापकांना रुग्णालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले. शिक्षण मंत्र्यांच्या या अवेळी दौऱ्याबद्दल पालकांनी तीव्र नाराजी प्रकट केली.
विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर मंगळवारी रात्री कळवा रुग्णालयात तातडीची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीत पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पोषण आहार पुरवणारी संस्था, शाळा प्रशासन आणि शिक्षणाधिकारी उपस्थित होते. आहाराची तपासणी न करताच मंगळवारी विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.
एफडीएने ठोकले सील
ठाण्यातील अनुदानित शाळांना शालेय पोषण आहार पुरविण्यासाठी शासनाने आशीर्वाद महिला मंडळ या संस्थेला ठेका दिला आहे. सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेलाही याच संस्थेकडून पोषण आहार दिला जातो. विषबाधेच्या घटनेनंतर ज्या ठिकाणी अन्न बनवले जाते त्याठिकाणी जाऊन अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पाहणी केली. यात त्रुटी आढळून आल्याने एफडीएने दुकानाला सील ठोकले.
आठ विद्यार्थ्यांची प्रकृती अद्याप खराब
मंगळवार रात्री उशिरापर्यंत एकूण ४५ विद्यार्थ्यांना कळवा रुग्णालयात भरती केले. त्यातील ३७ विद्यार्थ्यांना बुधवारी सुट्टी दिल्याची माहिती रुग्णालयाने दिली. उर्वरित आठ विद्यार्थ्यांमध्ये ताप व उलट्या ही लक्षणे असल्याने त्यांना अजून बारा तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवावे लागणार आहे.