लोखंडी गेट पायावर पडल्याने विद्यार्थ्याला झाली गंभीर दुखापत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:14 AM2019-07-30T00:14:07+5:302019-07-30T00:14:11+5:30

क्रीडासंकुलातील घटना : केडीएमसीच्या हलगर्जीचा फटका

The student suffered serious injuries after falling on an iron gate | लोखंडी गेट पायावर पडल्याने विद्यार्थ्याला झाली गंभीर दुखापत

लोखंडी गेट पायावर पडल्याने विद्यार्थ्याला झाली गंभीर दुखापत

Next

डोंबिवली : पूर्वेतील केडीएमसीच्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलाचे लोखंडी गेट पायावर पडल्याने सात वर्षांच्या ईशान खोत याला गंभीर दुखापत झाली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे गेट नादुरुस्त अवस्थेत असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली आहे. ईशानच्या पायाच्या बोटांना फ्रॅक्चर झाल्याने त्याला महिनाभर विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या घटनेमुळे आर्थिक नुकसान तर झाले आहेच. पण, त्याचबरोबर मानसिक त्रासही ईशानच्या कुटुंबाला सध्या सहन करावा लागत आहे.
ईशान हा ठाकुर्ली चोळेगाव तलावाच्या परिसरातील गृहसंकुलात राहतो. तो नेहमी व्यायामाच्या सरावासाठी केडीएमसीच्या

एमआयडीसीतील क्रीडासंकुलात जातो. गेल्या आठवड्यात तो व्यायाम करून वडिलांबरोबर क्रीडासंकुलाच्या बाहेर पडत होता. त्यावेळी प्रवेशद्वाराबाहेर उभ्या असलेल्या तरुणाचा गेटला धक्का लागला आणि ते गेट निखळून त्याच्या डाव्या पायावर पडले. यात ईशानच्या पायाच्या बोटांना गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांच्या एक्स रे तपासणीत बोटांना फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ईशानला महिनाभर विश्रांती घ्यावी लागणार असून, त्याची ५ आॅगस्टपासून शालेय परीक्षाही आहे. यात त्याचे शैक्षणिक नुकसान झाले आहेच, त्याचबरोबर महापालिकेच्या हलगर्जीमुळे त्याच्या पालकांना नाहक आर्थिक भुर्दंड आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
ईशानचे वडील सिद्धार्थ आणि आई दीपा हे दोघेही नोकरी करतात. ईशानला दुखापत झाल्याने त्यांनाही कसरतीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे ईशानला झालेल्या अपघातानंतरही ते गेट बदललेले नाही. त्यामुळे क्रीडासंकुलात खेळण्यासाठी येणाऱ्यांसाठी प्रवेशद्वारापासून इजा होण्याचा धोका कायम आहे. दरम्यान, तुटलेले गेट तेथून तत्काळ हलवावे, जेणेकरून अन्य कोणाला दुखापत होणार नाही, अशी मागणी ईशानचे वडील सिद्धार्थ यांनी केली आहे. तर, नाहक पडलेल्या भुर्दंडप्रकरणी भरपाई मिळावी, अशी मागणी त्याची आई दीपा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

मैदानाची सर्वच प्रवेशद्वारे झाली नादुरुस्त
च्क्रीडासंकुलात मोठ्या प्रमाणावर खेळाडू खेळण्यासाठी आणि सरावासाठी येतात. पण, येथील देखभाल दुरुस्तीकडे केडीएमसीचा कानाडोळा झाल्याचे पाहायला मिळत आहे. च्क्रीडासंकुलाला दोन प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी घरडा सर्कल ते सावित्रीबाई फुले नाट्यगृह चौकदरम्यान असलेले प्रवेशद्वार निखळून पायावर पडल्याने ईशान जखमी झाला, पण क्रीडासंकुलाच्या मैदानाचे प्रवेशद्वारही मोडकळीस आलेले आहे.
च्ईशानला झालेल्या अपघातानंतर तरी केडीएमसी प्रशासनाला जाग येणार का? तसेच खोत कुटुंबाला नाहक सोसाव्या लागलेल्या आर्थिक भुर्दंडप्रकरणी त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासन अथवा पदाधिकारी नगरसेवक पुढाकार घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: The student suffered serious injuries after falling on an iron gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.