विद्यार्थी १६३ आणि शिक्षक केवळ एकच

By admin | Published: April 10, 2017 05:33 AM2017-04-10T05:33:54+5:302017-04-10T05:33:54+5:30

भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बोरपाडा या प्राथमिक शाळेत १६३ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच

Students 163 and teachers are just one | विद्यार्थी १६३ आणि शिक्षक केवळ एकच

विद्यार्थी १६३ आणि शिक्षक केवळ एकच

Next

 रोहिदास पाटील / अनगाव
भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बोरपाडा या प्राथमिक शाळेत १६३ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, याकरिता शिक्षण विभागाकडे लेखी तक्र ारी करूनही नेमणूक न केल्याने शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ठाणे जिल्हा परिषद व भिवंडी पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या बोरपाडा या शाळेत १६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये जव्हार, मोखाडा या तालुक्यांतून वीटभट्टीवर स्थलांतरित झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या ७७ आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाच शिक्षकांची गरज असतानाही येथे एकही शिक्षक दिलेला नाही.
तीन वर्षांपासून एक शिक्षक आहे. तेच शाळेचे मुख्याध्यापक म्हणूनही काम पाहत आहेत. त्यांना केंद्रातील व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या बैठका व पत्रव्यवहार करण्याचीही जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या काळात वर्गाची जबाबदारी मुलावर देत किंवा शाळा सोडली जात असल्याची माहिती पालक व ग्रामस्थांनी दिली.
ज्या शाळा कल्याण व ठाणे शहराजवळ आहेत, त्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असतानाही जास्त शिक्षक आहेत. तेथे शिक्षकांच्या सोयीनुसार पंचायत समिती शिक्षण विभागाने त्यांच्या नियमांना बगल देऊन नियुक्त्या केल्या आहेत. त्या कोणत्या आधारे करण्यात आल्या, हे निदर्शनास आणूनही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती पालकांनी दिली.
शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आदिवासी, कातकरी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने या शाळेला शिक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच घनश्याम भोईर यांनी केली आहे.
या शाळेस तात्पुरता एक शिक्षक दिला आहे. मात्र, सरकारी परिपत्रकानुसार त्याचे वेतन काल्हेर शाळेत निघते. त्याला लेखी पत्रही दिलेले नाही.

तीन वर्षांपासून शाळेत एकच शिक्षक आहे,
हे खरे आहे. शिक्षकांच्या नेमणुका व्हाव्यात, याकरिता पत्रव्यवहार केला आहे.
- बाबू धापशी, मुख्याध्यापक व शिक्षक

बोरपाडा जि.प. शाळेत शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात, यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकरिता प्रयत्न सुरू आहे.
- कैलास सोनावणे, केंद्रप्रमुख

Web Title: Students 163 and teachers are just one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.