पडक्या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांचे अबकड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:07 AM2019-06-17T00:07:18+5:302019-06-17T00:07:41+5:30

प्रशासकीय मान्यतेअभावी कामे रखडली; धोकादायक वर्गखोल्यांमध्ये ८१ हजार विद्यार्थ्यांना धडे

Students are among the poor students ... | पडक्या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांचे अबकड...

पडक्या खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांचे अबकड...

googlenewsNext

वर्गखोल्यांचे गळके छत, तडा गेलेल्या भिंती, काचा फुटलेल्या खिडक्या, तुटलेले प्रवेशद्वार अशी धोकादायक अवस्था आहे, ती ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत काही शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी प्राथमिक सुविधांची मात्र वानवा दिसून येते. सोमवारपासून बहुतांश शाळा सुरू होणार असून, यंदाही अशाच धोकादायक शाळांमध्ये जीव मुठीत घेऊन सुमारे ८१ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार आहे. वर्गखोल्यांच्या दुरूस्तीला मंजुरी मिळाली असली तरी, ती दुरूस्ती प्रत्यक्षात कधी होईल, हे सांगणे कठीण आहे. या विदारक परिस्थितीचा आढावा घेतला आहे जान्हवी मोर्ये, मुरलीधर भवार, जनार्दन भेरे, पंकज पाटील आणि स्नेहा पावसकर यांनी.

ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात एक हजार ३३१ शाळा आहेत. शिक्षण विभागाकडे उपलब्ध असलेल्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील माहितीनुसार त्यातील ८१ वर्गखोल्या धोकादायक आहेत. या वर्गखोल्यांची दुरुस्ती-देखभाल व त्या नव्याने बांधण्याचे प्रस्ताव मागविण्यात आले असून त्याला प्रशासकीय मान्यता नसल्याने वर्गखोल्यांचे काम रखडले आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुमारे ८१ हजार विद्यार्थी शिकत आहेत. परंतु, धोकादायक वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने यंदाच्या वर्षी मागवलेल्या प्रस्तावांमधील १३९ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीला मंजुरी दिली आहे. तर, नव्याने वर्गखोल्या बांधण्यासाठी विविध शाळांचे प्रस्ताव प्रशासनाकडे आले आहेत. मात्र, ते लालफितीत अडकल्याने अद्याप त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.

वर्गखोल्यांची दुरुस्ती, देखभाल व त्या नव्याने बांधण्याचे प्रस्ताव हे गरजेनुसार मागविले जातात. त्यामुळे नव्या वर्गखोल्यांचे प्रस्ताव सरसकट येत नाहीत. वर्गखोल्यांची आवश्यकता कितीही जास्त प्रमाणात असली तरी, एका दमात ती पूर्ण करता येत नाही. तसेच एकाच वेळी जास्त वर्गखोल्या निर्लेखितही करता येत नाहीत. त्यामुळे शैक्षणिक अडचणी उद्भवण्याची भिती असते. बऱ्याच शाळांमध्ये आहे तेवढ्या वर्गखोल्यांचा पूर्ण वापर होत नाही. तेथे पटसंख्या कमी असली तर काही वर्गखोल्या वापराविना रिकाम्या असतात. त्यांचा वापर होत नसला तरी त्या निर्लेखित करता येत नाहीत. गरजेनुसार त्याची पुनर्बांधणी, देखभाल दुरुस्ती केली जाते.

देखभाल-दुरुस्ती व नव्याने वर्गखोल्या बांधण्यासाठी सव्वा नऊ कोटींचा निधी मंजूर आहे. हा निधी दोन वर्षांपर्यंत वापरता येऊ शकतो. धोकादायक वर्गखोल्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अनेकदा एका खोल्यात दोन वर्ग भरविले जातात. एका वर्गखोलीत ६० विद्यार्थी असले पाहिजेत. मात्र एखादी वर्गखोली धोकादायक झाल्यास दुसºया वर्गखोलीत १२० विद्यार्थी दाटीवाटीने बसून शिक्षण घेतात. अशावेळी पहिलीच्या विद्यार्थ्याच्या कानावर दुसरीचा अभ्यासही पडत असतो. मात्र त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी शाळा मुख्याध्यापक व शिक्षकाकडे पर्याय नसतो. अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करुन घेणे व विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी हा तोडगा काढला जात असला तरी गैरसोय विद्यार्थ्यांना सोसावी लागते. वर्गखोल्यांचे बांधकाम देखभाल दुरुस्ती ही उन्हाळी सुटीत केली जाते. मात्र, हे काम रखडल्यास एका वर्गात दोन वर्ग भरविले जातात. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मोठी कसरत करीत शिक्षण घ्यावे लागते. अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलामुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था आहे. मात्र, ग्रामीण भागात मार्चपासून पाणीटंचाईच्या झळा सुरू होतात. पाण्याअभावी शाळेतील प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो.

कल्याण तालुका वाहोली ग्रामपंचायत चार शाळा पटसंख्येअभावी बंद
कल्याण : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार शाळा प्रशासनाने विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद केल्या आहेत. या चार शाळा गतवर्षीच बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र या चार शाळेतील विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था प्रशासनाकडून अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. प्रशासनाकडून या शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत. एकीकडे जिल्हा परिषदेच्या चार शाळा बंद करण्यात आलेल्या असताना दुसरीकडे १२ इंग्रजी माध्यमांच्या शाळा याच परिसरात सुरु करण्याची परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे या भागात विद्यार्थी संख्या नाही असे कारण अयोग्य असल्याचे उघड झाले आहे.

वाहोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत वाहोली पाडा आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात या पाड्यावर दोन वर्गखोल्यांची सुसज्ज शाळा बांधण्यात आालेली आहे. या वाहोली पाड्याच्या शाळेत विद्यार्थी पटसंख्या १७ आहे. ही पटसंख्या कमी असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने शाळा बंद केली आहे. या १७ विद्यार्थ्यांना दुसºया मराठी शाळेत सामावून घेतले जाईल, त्यांची व्यवस्था केली जाईल, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली जाईल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात वर्ष गेले तरी त्यांची अशाप्रकारची कोणतीही व्यवस्थाच झालेली नाही. त्यामुळे ही १७ मुले शाळेविना प्रशासनाकडून मिळालेल्या सक्तीच्या सुट्टीचा आनंद लुटताना गावात दिसून येत आहेत. निंबवली गावापासून जवळ असलेल्या मोस, अनखर आणि म्हसळ येथील बेलकर पाड्यातील शाळादेखील पटसंख्येअभावी बंद केली आहे. शाळा बंद करण्यापूर्वी त्या शाळा परिसरात दोन किलोमीटरच्या अंतरात शाळा असायला हवी. मात्र तेवढ्या अंतरात शाळा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करुन दुसºया शाळेत जावे लागेल. शाळा बंद करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्थाही केलेली नाही. शाळा बंद केल्यावर गेल्या वर्षभरात पटसंख्या वाढविण्यासाठीही कोणते प्रयत्न केलेले नाही.

आदिवासी गावखेड्यात पाच-सहा पटसंख्या असली, तरी शाळा चालविली जाते. या ठिकाणी १७ विद्यार्थी संख्या असतानाही शाळा बंद केली गेली, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शाळा बंद केलेल्या परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांना परवानगी दिली गेली आहे, ही परवानगी कशाच्या आधारे दिली आहे असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. आघाडी सरकारच्या काळात वसंत पुरके यांनी वस्ती शाळा सुरु केल्या. वस्ती शाळांचे नंतर शाळेत रुपांतर झाले. मात्र आता हळूहळू या शाळा बंद होत आहेत. पटसंख्या रोडावली यासाठी शिक्षकही जबाबदार आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना शाळेकडे वळविले नाही, त्यामुळे ही स्थिती उद्भवली. परिणामी शाळेतील मुले वाºयावर असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्राविषयी आस्था असलेल्या मंडळीकडून केला जात आहे. प्रशासनाकडून मात्र याविषयी उलटसुलट उत्तरे दिली जात आहे. एकीकडे शाळाबाह्यविद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जात आहे. शिक्षणाचा हक्क हा कायदा केला गेला आहे. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात मात्र शाळा बंद करुन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे.

गोळवली गावातील शाळेची जुनी इमारत धोकादायक
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने धोकादायक व अतिधोकायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार गोळवली गावातील जिल्हा परिषदेची जुन्या शाळेची इमारत धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आलेले आहे. ही जुनी इमारत वर्गखोल्यांची आणि कौलारू होती. या धोकादायक शाळेचा प्रारंभ १५ आॅगस्ट १९८० रोजी झाला होता. ही इमारत धोकादायक असल्याने २००६-०७ मध्ये अंबरनाथ मतदारसंघाचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी सर्व शिक्षा अभियानाच्या निधीतून गोळवली गावातील जिल्हा परिषदेची शाळेची नवी इमारत बांधून तिचा शुभारंभ २००७ साली केला होता.

गोळवली जिल्हा परिषदेची शाळा १९५८ पासून अस्तित्वात होती. नवी इमारत तळ अधिक एक मजला अशी आहे. पहिल्या पावसामुळेच इमारतीच्या तळमजल्यावर पाणी साचलेले दिसून आले. धोकादायक इमारतीतून नव्या इमारतीत शाळा हलविण्यात आली, तेव्हा धोकादायक इमारतीच्या दोन खोल्यांचा वापर ग्रामपंचायत कार्यालयासाठी २०१० पर्यंत केला जात होता. कालांतराने ग्रामपंचायतीचीही नवी इमारत उभी राहिल्याने हा वापर २०१० पासून बंद आहे. धोकादायक शाळा जमीनदोस्त करण्याची कारवाई महापालिकेकडून अद्याप झालेली नाही. ही कारवाई केल्यास रिक्त झालेली जागा विद्यार्थ्यांकरीता खेळण्यासाठी उपलब्ध करुन दिली जाईल, असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.

अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या देखभाल-दुरूस्तीकडे दुर्लक्ष
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांपैकी अनेक शाळा ह्या बहुमजली करण्यात आल्या आहेत. मात्र असे असले तरी काही शाळांचे छत गळत असल्याने त्याची नियमित देखभाल दुरुस्ती होण्याची गरज आहे. इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने मुलांना चांगल्या वास्तूत शिक्षण घेता येत नाहीय. एकंदरीतच जिल्हा परिषदेच्या शाळांना उतरती कळा लागली आहे.

अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातच जिल्हा परिषदेच्या शाळा कार्यरत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील सर्व शाळा ह्या संबंधीत पालिकांनी जिल्हा परिषदेकडून स्वत:कडे वर्ग केल्या आहेत. शहरी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा या पालिकांकडे वर्ग झालेल्या असल्या तरी अजूनही संबंधित शाळांच्या जागा मात्र जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत.

शाळांचा विकास करताना जिल्हा परिषदेची परवानगी लागत आहेत. अंबरनाथ शहरात जिल्हा परिषदेच्या पाच शाळा असून त्या अजूनही पालिकेकडे वर्ग झालेल्या नाही.

शहरातील पालिकेच्या ताब्यात असलेल्या शाळेच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती ही समाधानकारक आहे. मात्र देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष हीच दुखरी जखम आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधील वातावरण हे अस्वच्छ आणि कोंदट असेच आहे. अनेक वर्गात मुलांना बसण्यासाठी बाकं नाहीत. त्यामुळे मुलांना खाली बसून अभ्यास करण्याशिवाय पर्याय नसतो.

स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छतेचा अभाव जाणवतो. काही ठिकाणी मुलांसाठी शाळेच्या आवारात पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही. शाळा ही जिल्हा परिषदेची असली तरी तिच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबत शिक्षकांना पुढाकार घेत लोकसहभागातून काही दुरुस्तीची कामे करावी लागत आहे. साहित्य खरेदीसाठीही आता लोकसहभागावर अवलंबून राहण्याची वेळ येत आहे.

पिसवली शाळेची दुरवस्था
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत २७ गावे २०१५ साली समाविष्ट झाली असली तरी २७ गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा अद्याप महापालिकेकडे हस्तांतरीत झालेल्या नाही. त्या जिल्हा परिषदेच्या ताब्यातच आहे.
त्यांचा कारभार जिल्हा परिषदेकडून चालविला जात आहे. जिल्हा परिषदेच्या पिसवली शाळेची दुरवस्था झाली आहे. ही शाळा उपक्रमशील शाळेत गणली जाते. डिजिटल शाळा म्हणून तिची ख्याती असली तरी शाळेची वास्तू प्रशस्त नसून शाळेला सिमेंटच्या पत्र्याचे छत आहे.

कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या पिसवली शाळेला डिजिटल शाळेचा मान मिळाला आहे. शाळेच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. शाळेचा पाया घुशींनी पोखरून ठेवलेला आहे. एका भिंतीला तडा गेला आहे. वर्गखोल्यांची तावदाने व खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. शाळेला लोखंडी प्रवेशद्वार असले तरी सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षारक्षक नेमलेला नाही.

शाळा डिजिटल असल्याने शाळेत संगणक आहेत. मात्र वर्गखोल्यांच्या खिडक्या तुटलेल्या असल्याने त्यावाटे संगणकाची चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक शाळेला छोटे पटांगण आहे. मात्र ते खडकाळ आहे. पटांगण विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी असते, मात्र अशा खडकाळ पटांगणावर खेळताना विद्यार्थ्यांना पडून दुखापत होण्याची शक्यता आहे. शाळेने पत्र्यालगत एक सोलर पॅनल बसविले आहे, मात्र ते वाºयाने केव्हाही उडून नुकसान होऊ शकते.

शाळेच्या मागच्या बाजूला मोकळी जागा आहे. त्याठिकाणी शाळेच्या छतावर असलेली कौले रचून ठेवली आहे. एक वर्ग पडीक असून तो मोकळाच आहे. या शाळेच्या शेजारी उच्च प्राथमिकच्या तीन वर्गखोल्या आहे. या खोल्यांना लोखंडी शटर आहे.
खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत. याठिकाणी भले मोठे मैदान आहे. या वास्तूच्या समोरच भली मोठी केबल वायर नुसतीच पडून आहे. ही केबल वायर कोणी टाकली, कधी टाकली याची माहिती तेथील कोणालाच नाही. पटांगणाला संरक्षक भिंत आहे. मात्र तिची उंची कमी असल्याने तुटलेल्या दोन्ही गेटमधून कोणीही प्रवेश करु शकते.

पहिल्याच पावसात शाळेच्या प्रांगणात पाण्याचे तळे साचले आहे. शाळेच्या संरक्षक भिंतीच्या आतल्या जागेत कचरा साठलेला आहे. हा कचरा कोणी टाकला याचीही माहिती कोणाला नाही. या कचºयाच्या दुर्गंधीचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. तसेच पुढील काही दिवसात तो उचलला गेला नाही तर शाळेच्या आवारात कचºयाचे साम्राज्य निर्माण होईल.

Web Title: Students are among the poor students ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.