आश्रमशाळेतील विद्यार्थी आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:15 AM2018-07-11T01:15:11+5:302018-07-11T01:15:25+5:30

आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जाणारा फळांचा सकस पौष्टिक आहार बंद करून दूध पुरवठा करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला.

 The students of the ashram school are deprived of food | आश्रमशाळेतील विद्यार्थी आहारापासून वंचित

आश्रमशाळेतील विद्यार्थी आहारापासून वंचित

Next

जव्हार - आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना दिला जाणारा फळांचा सकस पौष्टिक आहार बंद करून दूध पुरवठा करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला. मात्र आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत आहार पुरविला जात नाही. आदिवासी विद्यार्थ्यांना फक्त उसळीचा नाश्ता, डाळ भात भाजी मिळत असून, दूध पुरवठयाचे टेंडर गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. त्यामुळे आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना ना फळांचा , ना दुधाचा पुरवठा अशी स्थिती आहे. त्यामुळे आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थ्यांचा आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा मार्फत ३० शासकीय आश्रम शाळा व १७ विनाअनुदानित आश्रम शाळा असून, अशा एकूण-४७ आश्रम शाळा चालविल्या जात असून, एकूण १७ हजार ५४० विद्यार्थी त्यात निवासी शिक्षण घेत आहेत.
या विद्यार्थांना यापूर्वी दररोज सकाळी सकस आहार म्हणून केळी, सफरचंद, मोसंबी, अंडी असा सकस आणि पौष्टिक आहार पुरविण्यात येत होता. मात्र आदिवासी विकास विभागाने फळांचा सकस आहार बंद करून, दूध पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मात्र आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना मागील वर्षपासून दूधही मिळत नाही त्यामुळे ना फळांचा ना दुधाचा पुरवठा अशी अवस्था आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जूनच्या सुरवातीचे काही महिने मुख्याध्यापकस्तरावर टेंडर मागवुन दूध पुरवठा केला जावा, असे आदेश प्रकल्प अधिका-यांनी दिले होते. मात्र वेळेत ठेकेदाराचे बिल मिळत नाही, किंवा अन्य अडचणींमुळे मुख्याध्यापकांनीही दूध पुरवठा करण्यास नकार दिला. त्यामुळे आदिवासी विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या पोटावर गदा आणली आहे.
सध्या आदिवासी विद्यार्थ्यांना फक्त सकाळी काडधान्य उसळीचा नाश्ता, दुपारी डाळ, भात, भाजी खाण्याची वेळ आली आहे. कुठलाच पौष्टीक आहार मिळत नसल्याने पालकवर्गही चिंतेत असून, आमच्या विद्यार्थ्यांना फळांचा पुरवठा नियमित करावा अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून केली जात आहे.

फळांचा आहार बंदच केला आहे. गेल्या वर्षी टेंडर काढायला उशीर झाला. या महिनाभरातच दूध चालू करण्यात येईल.
- अजित कुंभारे (भा.प्र. से.) प्रकल्प अधिकारी,

आमच्या मुलांना आश्रम शाळेत सफरचंद, केळी, अंडी, मिळत होती. तोपर्यंत आमची मुलं आनंदाने शाळेत जात होती. परंतु आता शाळेत फळं व अंडी असा आहार मिळत नसल्याने ती आता शाळेत जायला नकार देत आहेत.
- चिंतामण कुरबुडे, पालक.

आम्ही नेहमी सकस आहार व फळांबाबत शाळेतील मुख्याध्यापकांना विचारणा करतो. दूध येईल असें सांगण्यात येतें. परंतु ते ही काही मिळत नाही. त्यामुळे प्रकल्पाने फळे किंवा दूध असा कुठलातरी आहार चालू करावा.
- सुधीर बुधर, पालक

Web Title:  The students of the ashram school are deprived of food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.