दोन डोसमधील अंतर कमी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:30 AM2021-06-04T04:30:51+5:302021-06-04T04:30:51+5:30
कल्याण : परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने बुधवारपासून लसीकरणाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. दोन दिवस ...
कल्याण : परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने बुधवारपासून लसीकरणाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. दोन दिवस या लसीकरणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. मात्र, लसीकरणाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता महापालिकेने बुधवारी आणि गुरुवारी थेट लसीकरणाची सुविधा कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी लसीकरण केंद्रात केली होती. परदेशी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने अन्य नागरिकांचे लसीकरण बंद ठेवल्याचे महापालिकेने स्पष्ट केले होते. या केंद्रावर बुधवारी २४१ विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा पहिल्या डोसचा लाभ घेतला. या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन नोंदणी पद्धती नसून, टोकन देण्यात आले होते. टोकन घेऊन विद्यार्थी रांगेत उभे होते. महापालिकेच्या हद्दीबाहेरील काही विद्यार्थी लसीकरण केंद्रावर पोहोचले होते. मात्र, महापालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांनाच लस दिली जाईल, असे महापालिकेने सांगितले. मुळात लसीचे डोस कमी असल्याने महापालिकेने अन्य नागरिकांचे लसीकरण दोन दिवस बंद ठेवून विद्यार्थ्यांच्या लसीकरणास प्राधान्य दिले.
पहिला डोस या विद्यार्थ्यांनी कोविशिल्ड लसीचा कल्याण डोंबिवलीत घेतला आहे. मात्र, परदेशी शिक्षणाच्या प्रवेशाची प्रक्रिया जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होते. पहिल्या व दुसऱ्या डोसमधील अंतर हे ८४ दिवसांचे आहे. या अंतरानुसार त्यांना दुसरा डोस परदेशात घ्यावा लागेल. त्याऐवजी दोन डोसमधील अंतर कमी करून ते ३० ते ४० दिवसांचे असावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दाेन डाेसमधील अंतर कमी केल्यास दुसरा डाेसही मायदेशीच घेऊन विद्यार्थी परदेशी रवाना हाेतील. याठिकाणी कोविशिल्ड लस विद्यार्थ्यांना दिली जात आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिनची लसही दिली जाणार आहे. मात्र, या लसीचा समावेश आंतरराष्ट्रीय लसीकरणाच्या यादीत नाही, हा मुद्दाही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
---------------------