पहिल्या यादीवर विद्यार्थ्यांची नजर; ठाण्यातील महाविद्यालयांचाही कटआॅफ वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 02:11 AM2018-07-05T02:11:00+5:302018-07-05T02:11:12+5:30
दहावीचा निकाल चांगला लागला असून त्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
ठाणे : दहावीचा निकाल चांगला लागला असून त्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. उद्या (गुरुवारी) अकरावी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर होणार असून ठाण्यातील प्रमुख महाविद्यालयांचा कटआॅफ एक ते दोन टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईप्रमाणेच ठाण्यातीलही प्रमुख महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. निकाल लागल्यावर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरताना विद्यार्थी सर्वच प्रमुख महाविद्यालयांच्या गतवर्षीच्या कटआॅफची शोधाशोध करतात आणि त्यानुसारच महाविद्यालयांना पसंतीक्रम देतात. यंदा चांगल्या निकालामुळे सर्वच महाविद्यालयांचा कटआॅफ वाढण्याची शक्यता आहे. ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाºयांची संख्या मोठी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पहिल्याच लिस्टमध्ये प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही, अशी धाकधूक आहे. वाढत्या गुणवत्तेबरोबर महाविद्यालयांच्या प्रत्येक शाखेच्या कटआॅफमध्ये वाढ होते आहे. हीच परिस्थिती यंदाही कायम राहिली, तर अनेक विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीच्या महाविद्यालयासाठी दुसºया मेरिट लिस्टवर, तर काहींना तिसºया मेरिट लिस्टपर्यंतही वाट पाहावी लागू शकते, असे मत काही प्राचार्यांनी व्यक्त केले आहे.
यंदाच्या दहावीच्या निकालात ८५ ते ९५ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही प्रमुख महाविद्यालयांचा कटआॅफ किमान दोन टक्क्याने वाढणार, हे नक्की. त्यामुळे ८५ ते ९५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना तरी पहिल्याच मेरिट लिस्टमध्ये प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची शक्यता कमी आहे.
- डॉ. चंद्रशेखर मराठे, प्राचार्य, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय