विद्यार्थी खुश; पण पालक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:19+5:302021-04-04T04:42:19+5:30

स्नेहा पावसकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्या वर्षभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याच नाहीत आणि ...

Students happy; But parents worry | विद्यार्थी खुश; पण पालक चिंतेत

विद्यार्थी खुश; पण पालक चिंतेत

Next

स्नेहा पावसकर

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गेल्या वर्षभरातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याच नाहीत आणि यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी जाहीर केला आणि तमाम विद्यार्थीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले. आपण पास होणार या बातमीने विद्यार्थी सुखावले; पण विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो आहे, संपूर्ण शिक्षण त्यांना मिळत नसून ही बाब त्यांच्या विकासाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यामुळे हे कोरोनाचे संकट टळू दे, अशी भावना पालकवर्गातून व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भाग वगळता उर्वरित कुठेही प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याच नाहीत, तर कालांतराने वाढती रुग्णसंख्या पाहता ग्रामीणमध्ये सुरू झालेली शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद केली गेली. जवळपास वर्षभर ऑनलाइन शिक्षणावर भर दिला गेला. मात्र, यातील अनेक अडथळे पाहता मुलांचा अभ्यासक्रम कमी केला गेला. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता ऑनलाइन शिक्षणाचा कालावधी कमी केला. मुलांना अभ्यासाबाबत कडक सक्ती न करण्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सुचवले. एकूणच या सगळ्यामुळे मुलांना बरीच मोकळीक मिळाली आणि आता तर मुलांचे वर्ष फुकट जाऊ नये म्हणून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णही केेले गेले. सरकारचा हा निर्णय मुलांच्या दृष्टीने हितकारक आहे. मात्र, यामुळे काही मुले अभ्यासाकडे अजिबात लक्ष देत नसल्याचे मत काही शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.

---------------

आम्ही वर्षभर अभ्यास केला; पण परीक्षा घेऊन त्याचे गुण कोणत्या आधारावर देणार हे समजतच नव्हते. त्यामुळे सरसकट उत्तीर्ण करून आम्हाला आनंद झाला आहे.

-रुची गोडांबे, विद्यार्थिनी, आठवी

--------------

काही मुले अभ्यास करतात, बरीच मुले अभ्यास लक्ष देऊन करत नाहीत. मुळात क्लासची वेळ कमी झाली, अभ्यासक्रम कमी झाला. यात मुलांपर्यंत नेमका परिपूर्ण अभ्यासक्रम पोहोचतच नाही. सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय अयोग्य नाही; पण मुलांना या आयत्या उत्तीर्ण होण्याची सवय लागू नये, याची भीती वाटते.

-धर्मेश पानघरे, पालक

-------------

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा सरकारचा निर्णय योग्य वाटतो; पण अशाने अभ्यास न करणाऱ्या मुलांनाही आयते गुण मिळतात; तर मुलांचे अभ्यासाबद्दलचे गांभीर्य कमी होऊ नये आणि त्यांनी घरी राहूनही तितक्याच चिकित्सकतेने अभ्यास केला पाहिजे. मुळात लवकरात लवकर हे कोरोनाचे संकट टळले, तर मुलांना शाळेचे आणि शाळेतील अभ्यासाचे महत्त्व कळेल व ते कळले पाहिजे.

-रामेश्वर नाचण, पालक

Web Title: Students happy; But parents worry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.