उल्हासनगरातील विध्यार्थ्यांना मिळणार दुसरी सुसज्ज अभ्यासिका
By सदानंद नाईक | Updated: February 2, 2025 20:41 IST2025-02-02T20:40:55+5:302025-02-02T20:41:12+5:30
युपीएससी व एमपीएससी स्पर्धा कार्यशाळा

उल्हासनगरातील विध्यार्थ्यांना मिळणार दुसरी सुसज्ज अभ्यासिका
सदानंद नाईक,उल्हासनगर : शहरातील मुले स्पर्धात्मक परीक्षेत राज्य व देश स्तरावर चमकावे म्हणून महापालिकेने शाळा क्रं-१७ येथे दुसरी सुसज्ज अभ्यासिका उभारली आहे. एकाच वेळी शंभर विध्यार्थी अभ्यास करू शकतील, अश्या अभ्यासिकेचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर. लेंगरेकर यांनी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेने सन-२०१६-१७ साली महापालिका शाळा प्रांगणात तीन मजली डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उभारली आहे. अभ्यासिकेतून शेकडो विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असून मागील पाच वर्षात शेकडो मुलांनी विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवून अभ्यासिकेचे उद्दिष्ट सार्थकी केले. देशमुख नावाचा विध्यार्थी थेट युपीएससी परीक्षेत चमकला असून एमपीएससी परीक्षेसह अन्य स्पर्धात्मक परीक्षेत विध्यार्थ्यानी बाजी मारली आहे. तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे व महापौर अपेक्षा पाटील, उपमहापौर पंचशीला पवार व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका अस्तित्वात आली.
महापालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका या धर्तीवर चोपडा कोर्ट परिसरातील शाळा क्रं-१७ मधील प्रांगणात दुसरी अभ्यासिका उभी राहत आहे. त्या अभ्यासिकेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचा लाभ विध्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी मनविसेचे जिल्हाप्रमुख बंडू देशमुख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याची माहिती जमीर लेंगरेकर यांनी दिली. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजिज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या संकल्पनेतून ही दुसरी अभ्यासिका साकार होत आहे.
स्पर्धात्मक परीक्षेसाठी कार्यशाळा
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ५ फेब्रुवारी रोजी महापालिका सिंधू भवन येथे ठेवण्यात आले. यावेळी एमपीएससी, युपीएससी आदी स्पर्धात्मक परीक्षे बाबत तज्ज्ञ विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.