कल्याण शहराजवळच्या गावांतील विद्यार्थ्यांचा जीवघेणा शाळा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 11:17 PM2019-07-13T23:17:59+5:302019-07-14T06:55:51+5:30

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शहरांनास्मार्ट सिटीचे वेध लागले आहेत.

Student's journey to life-threatening school | कल्याण शहराजवळच्या गावांतील विद्यार्थ्यांचा जीवघेणा शाळा प्रवास

कल्याण शहराजवळच्या गावांतील विद्यार्थ्यांचा जीवघेणा शाळा प्रवास

Next

सुरेश लोखंडे

ठाणे : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शहरांना स्मार्ट सिटीचे वेध लागले आहेत. एकीकडे शहरे स्मार्ट होत असताना या जिल्ह्यांतील ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागांच्या समस्या कायम आहेत. विद्यार्थ्यांना अजूनही नदीनाल्यांतून जीवघेणा प्रवास करून शाळा गाठावी लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराजवळील गावांसह शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांत, तर पालघर जिल्ह्यातील मोखाडा, डाहाणू, जव्हार आणि तलासरीतील विद्यार्थी पाण्यातून मृत्यूची वाट तुडवत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना झगडावे लागत असल्याचे विदारक चित्र दुर्गम भागात दिसत आहे.
अहमदनगर महामार्गावरील कल्याण तालुक्यातील मामणोली गावापासून तीन किलोमीटरवरील बांगरवाडीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नदीनाल्यांच्या पाण्यातून वाट काढत चौथी इयत्तेनंतरचे शिक्षण घेण्यासाठी कुंदे येथील शाळेत जात आहेत. बांगरवाडीत ४० घरे आहेत. पाण्याशी दोन हात करून विद्यार्थ्यांना प्रवास करून शाळेत जावे लागत असल्याची शोकांतिका पाहायला मिळत आहे. बांगरवाडीपासून कुंदे गावापर्यंतचा काही रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे; पण २०० मीटरचा रस्ता हा जागेच्या वादामुळे अपूर्णावस्थेत आहे. याच रस्त्यावरून नाल्यासारखे पाणी वाहत आहे. त्या पाण्यातून रस्त्याचा अंदाज घेत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना तीन ते चार फूट पाण्यात वाट काढावी लागत आहे.
विद्यार्थी आपली दप्तरे कशीबशी सांभाळत डोक्यावर घेऊ न या पाण्यातून शाळेत जातात. त्यांना ओल्या गणवेशातच वर्गात शिक्षण घ्यावे लागत आहे. या रस्त्यावरील वाहत्या पाण्यातून विद्यार्थी वाहून जाण्याची भीती आहे.
शाळेची ओढ लागलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी एकमेकांचा हात धरून पाण्यातून वाट काढत शिक्षण घेत आहेत. याप्रमाणेच शहापूर तालुक्यातील डिंभे येथील सुमारे ५० विद्यार्थी नदीनाले आणि ओहोळाच्या पाण्यातून टहारपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर शाळेत जात आहेत. याशिवाय, भिवंडी तालुक्यातील बीजपाडा येथील २५ विद्यार्थी शहापूर तालुक्यातील पिवळी येथील किल्ले माहुली ग्रामीण विद्यालयात नदीओढे पार करून येतात. तानसा अभयारण्यातील या दोन्ही गावांच्या विद्यार्थ्यांना नदीनाल्यांच्या पुराशीही सामना करावा लागतो. सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतर या विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. मुरबाड तालुक्यातील टोकावडेच्या जंगलपट्ट्यात, शाई, काळूच्या खोऱ्यांतील काही गावपाड्यांच्या विद्यार्थ्यांना असाच प्रवास करत शिक्षण घ्यावे लागत आहे.
>पालघरमध्ये होडी, टायरवरून प्रवास
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामधील तलवाडा गावाजवळील भावडी गावातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना १२ महिने लाकडी होडीतून प्रवास करावा लागतो. १०० मीटर नदीचे पात्र ओलांडून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. त्यासाठी शासनाने काहीही व्यवस्था केलेली नाही. गावकऱ्यांनीच लाकडी होडी तयार करून व्यवस्था केली आहे.
विक्रमगड तालुक्यातील म्हसा या गावातील विद्यार्थिनी-विद्यार्थी नदीच्या पाण्यात टायर सोडतात. या नदीपात्रात तरंगणाºया टायरवर बसून विद्यार्थी नदीतून प्रवास करून वाकी येथे शाळेत जातात. जव्हारच्या डोंगरपाड्यातील, डहाणूतील आष्टेपाडा येथील विद्यार्थीही ओहोळाच्या पाण्यातून वाट काढून शाळेत जातात. धांगडा, डोंगरशेत परिसरातील विद्यार्थ्यांनाही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
काळू नदीला पूल नसल्यामुळे नदीच्या पाण्यातून तलासरीच्या सावरोली-अणवीर या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. मोखाडा तालुक्यातील बोटोशी, आमळे, घोडीपाडा, मुकुंदपाडा, कोल्हेधाव, बालघोडा, कुरलोड पीकी, आंब्याचापाडा, रायपाडा आदी गावांतील विद्यार्थ्यांना नदीपात्रातून येजा करावी लागते. या जीवघेण्या प्रवासामुळे अनेक मुलांनी शाळाच सोडली आहे. जव्हार तालुक्यातील सारसून, खंडीपाडा, विनवल, माळघर, दापटी, वांगणी, बेहडपाडा या गावांचा रस्त्यातील मोरीचा पाइप दोन ठिकाणी फुटला आहे. त्यातील पाण्यात पडून जीवितहानी होण्याची शक्यता गावकºयांसह विद्यार्थी वर्तवत आहेत.

Web Title: Student's journey to life-threatening school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.