उल्हासनगरमध्ये पालिका विद्यार्थ्यांचे सुरू आहे गळक्या वर्गांत शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:19 AM2019-07-07T00:19:24+5:302019-07-07T00:19:29+5:30
शिक्षण मंडळाचा सावळागोंधळ। नवी इमारत ताब्यात घेण्याचे आयुक्तांचे आदेश
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका शाळा क्रमांक ८ व २९ मधील शेकडो मुले नवीन इमारतीऐवजी जुन्या गळक्या व धोकादायक शाळेत जीव धोक्यात घालून धडे गिरवत आहेत. या प्रकाराने पालकांनी संताप व्यक्त केला असून नवीन इमारत ताब्यात घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. तर, इमारत बांधकामाचे बिल न दिल्याने हस्तांतर रेंगाळल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर पालिकेच्या दोन शाळांच्या इमारती धोकादायक होऊन गळती लागल्याने नवीन इमारतीच्या बांधकामाला तीन वर्षांपूर्वी पािलकेने मंजुरी दिली. गेल्यावर्षीच बांधलेल्या नव्या इमारतीचे हस्तांतर व्हायला हवे होते. मात्र, महापालिका व शिक्षण मंडळातील सावळ्यागोंधळामुळे इमारतीचे बांधकाम रेंगाळले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांना शाळा क्रमांक २९ ला गळती लागून मुले पावसात भिजत शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली. रगडे यांनी शनिवारी दुपारी शाळेला भेट दिली असता शेकडो मुले गळक्या व धोकादायक शाळेत शिक्षण घेत असल्याचे चित्र दिसले. तसेच समोरच शाळेची नवीन इमारत बांधून तयार आहे. मात्र, कंत्राटदाराला बिल न मिळाल्याने इमारतीचे हस्तांतर झाले नाही, अशी माहिती त्यांना मिळाली. या प्रकाराबाबत रगडे यांनी संताप व्यक्त करत सर्व प्रकार आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कानांवर घातला. महापालिकेला इमारत हस्तांतरित करण्यास तयार असून बिल दिले गेले नाही, हे कारण नसल्याचे कंत्राटदाराने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. एकूणच सावळ्यागोंधळामुळे मुले धोकादायक व गळक्या शाळेत शिक्षण घेत आहेत.
शेकडो मुलांचा जीव धोक्यात
महापालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती ६० वर्षांपूर्वीच्या असून त्यांना गळती लागून धोकादायक झाल्या आहेत. अशा शाळेत शेकडो मुले जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शाळा क्रमांक २९ व ८ ची नवीन इमारत उभी असताना मुले जुन्या इमारतीत शिक्षण घेत असल्याने, शिक्षणाप्रति महापालिकेची आस्था उघड झाली आहे.
विद्यार्थी नव्या इमारतीऐवजी धोकादायक व गळक्या इमारतीत शिक्षण घेत असल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आयुक्त देशमुख यांनी दखल घेऊन नवीन इमारत ताब्यात घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तर, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एस.बी. मोहिते यांनी कंत्राटदाराचे बिल न दिल्याने, इमारतीचे हस्तांतर मंडळाकडे झाले नसल्याचे सांगितले. तसेच उपलेखा अधिकारी नीलम कदम यांनी इमारतीचे १० टक्के काम शिल्लक राहिल्याने इमारतीचे हस्तांतर झाले नाही, अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांना गळक्या वर्गात शिक्षण घ्यावे लागत असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.