सरस्वती छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली तांदळाची लावणी
By प्रज्ञा म्हात्रे | Published: July 21, 2024 05:13 PM2024-07-21T17:13:19+5:302024-07-21T17:13:40+5:30
'लावणी ते कापणी' या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ
ठाणे: गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर, "निसर्ग माझा गुरू" या संकल्पनेखाली, ठाण्यातील येऊर येथील निसर्गरम्य परीसरात विद्यार्थ्यांना भात लावणीचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण नौपाडा येथील सुप्रसिद्ध सरस्वती विद्या मंदिर शाळेतर्फे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात सरस्वती छात्र सेनेचे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना अनुभवी शेतकऱ्यांनी भात लावणीची योग्य तंत्रे शिकवली. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने आणि आनंदाने भात रोपांची रोपणी केली.
स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी ताम्हणे यांनी स्थापन केलेल्या येऊर येथील अनंताश्रम संस्थेच्या आवारातील शेतात, सरस्वती मंदिरच्या छात्र सनिकानी अनोखी पद्धतीने गुरू पौर्णिमा संपन्न केली. अनंताश्रम संस्थेचे चालक लाड त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला गेला होता. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भात लावणीचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणे आणि त्यांना कृषी क्षेत्राबद्दल जागरूक करणे हा होता. यातून विद्यार्थ्यांना शेतीबद्दल ज्ञान, अन्नधान्याची किंमत आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्त्व समजून घेण्यास मदत झाली.कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त. सुरेंद्र दिघे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचे रक्षण करण्याचे आणि कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला शाळेच्या माजी विद्यार्थिनी तसेच कृषी शास्त्रात सुवर्णपदक विजेत्या सीमा हर्डीकर यांनी विद्यार्थ्यांना भात लावणीचे योग्य मार्गदर्शन केले. या उपक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी तसेच येऊर एंव्हायर्नमेंटल सोसायटीचे अध्यक्ष रोहित जोशी उपस्थित होते. अनंताश्रमाचे कर्मचारी संकेत आणि सूरज यांनी या उपक्रमास सक्रिय सहकार्य केले. "निसर्ग माझा गुरू" या संकल्पनेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्यास आणि त्यांना कृषी क्षेत्राबद्दल जागरूक करण्यास मदत झाली. भविष्यात नवीन शिक्क्षण धोरणास अंतर्गत कौशल्य विकसित अभ्यासक्रमा साठी ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांना शेतकी कौशल्य विकसित करण्यास संधी मिळेल. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होईल आणि ते भविष्यात निसर्गाशी जोडले गेलेले सक्षम नागरिक बनतील अशी अपेक्षा आहे. असे दिघे यांनी सांगितले.