शाळा नाही की परीक्षा तरी विद्यार्थी झाले पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:06+5:302021-06-24T04:27:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेले वर्षभर कोरोनामुळे शाळा भरल्याच नाहीत. ऑनलाईन वर्ग झाले. परंतु शाळेत जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गेले वर्षभर कोरोनामुळे शाळा भरल्याच नाहीत. ऑनलाईन वर्ग झाले. परंतु शाळेत जाण्याचा आनंद विद्यार्थ्यांना घेता आला नाही, की प्रत्यक्ष परीक्षांचे दडपण आले नाही. मात्र, तरीही गेल्या शैक्षणिक वर्षात सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत. ठाणे जिल्हा हद्दीतील मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा परिषदेच्या १,३२८ प्राथमिक शाळांतील सुमारे ७७ हजार ८५२ विद्यार्थी पास झाले आहेत.
गेल्या वर्षी मार्च २०२०मध्ये सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कमी झाल्यावर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासनाचे नियम पाळून काही प्रमाणात शाळा सुरू केल्या होत्या. मात्र, कोरोनाची भीती असल्याने बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले नव्हते, तर त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अगदी काही दिवसांतच पुन्हा ग्रामीण भागातील शाळा बंद करण्यात आल्या. वर्षअखेरीस विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत उत्तीर्ण करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. ऑनलाईन वर्गाद्वारे या विद्यार्थ्यांना वर्षभरात शिक्षण मिळालेले असले तरी ठाणे जिल्ह्यातील बहुतांश मुले ही वर्षभरात शाळेत गेलेली नाहीत. त्यामुळे शाळा किंवा परीक्षेविना पास होणे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या दृष्टीने तितकेसे बरोबर नाही, असे मत काही पालकांनी व्यक्त केले.
-----------------
ऑनलाईन शिक्षणाचे फायदे
कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी यावर्षी ऑनलाईन शिक्षण घेतले. अगदी संकटाच्या काळी हा पर्याय चांगला ठरला. घरात बसले तरी शिक्षणात खंड पडत नाही, हे यातून लक्षात आले. भविष्याच्या दृष्टीने ऑनलाईन शिक्षण चांगले माध्यम ठरले. अगदी ज्युनिअर, सिनिअर केजीची मुलेही ऑनलाईन वर्गात सहज रमलीत. मुले तंत्रज्ञानाशी अगदी सुपरिचित झालीत.
----------
ऑनलाईन शिक्षणाचे तोटे
कोरोनामुळे वर्षभर शिक्षण ऑनलाईन झाले. पण, प्रत्यक्ष व ऑनलाईन शिक्षणात खूप फरक आहे. मुलांची अभ्यासाची सवय तुटली. इतर खेळ, ॲक्टिव्हिटी या सगळ्यात मुले मागे पडली. परीक्षा नसल्याने मुलांनी अभ्यासाचा ताण घेणे कमी केले.
------------
ग्रामीण व शहरी भागातील फरक
शहरी भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षणात फारसा व्यत्यय येत नाही. मात्र, ग्रामीण भागातील मुलांची आधीच आर्थिक परिस्थिती बेताची असते. मोबाईल असतातच असे नाही. एका घरात दोन मुले असली तरी त्यांच्या वेळेनुसार मोबाईल उपलब्ध होत नाहीत. असले तरी त्यात रिचार्ज कधी असते किंवा नाही, अनेकदा इंटरनेटमध्ये अडथळे येतात. त्यांना शेतातील कष्टाची कामे करावी लागतात. त्यातून वेळ मिळाल्यावर मुले अभ्यास करतात.