कोरोनाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांची स्थानिक महाविद्यालयांना पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:53 AM2020-08-03T00:53:15+5:302020-08-03T00:53:35+5:30
अकरावी प्रवेश : ठाण्यातील महाविद्यालयांचा कटआॅफ वाढण्याची शक्यता
स्रेहा पावसकर
ठाणे : यंदा दहावीच्या निकालात घसघशीत वाढ झाल्याने अकरावीच्या अॅडमिशनसाठी चुरस निर्माण होणार आहे. गेल्या वर्षीचा कटआॅफ पाहता ठाण्यातील नामांकित महाविद्यालयांचे यंदाचे कटआॅफ वाढणार, असे अंदाज लावले जात असतानाच यंदा कोरोनाच्या भीतीने अनेक पालक आपल्या पाल्याला शिक्षणासाठी जवळपासच्याच चांगल्या महाविद्यालयात अॅडमिशन घेऊ इच्छित आहेत. त्यामुळे मुंबईतील नामांकित महाविद्यालयांमध्ये जाण्यापेक्षा ठाणे-कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश विद्यार्थी येथीलच महाविद्यालयांत प्रवेशाला पसंती देताना दिसत आहेत.
यंदा सीबीएसईचा आणि त्यापाठोपाठ एसएससी बोर्डाचा निकालही खूपच चांगला लागला आहे. ठाणे जिल्ह्याचाही यंदा विक्रमी निकाल लागला आहे. ९०-९५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे अकरावीच्या अॅडमिशनची आणि कटआॅफ लिस्टसाठीची स्पर्धा वाढणार आहे. प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून विद्यार्थी गतवर्षीच्या कटआॅफवरून यंदाच्या कटआॅफबाबत अंदाज लावत आहेत. एरव्ही, ठाणे-डोंबिवलीतील विद्यार्थी मुंबईच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाला प्राधान्य देतात. तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांतील महाविद्यालयांतही प्रवेश घेऊ इच्छितात. याशिवाय, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थीही ठाण्यातील महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी धडपडत असतात. मात्र, यंदा निकाल चांगला लागल्याने मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचा कटआॅफ वाढणार, हे निश्चित असल्याने अनेकांनी ठाण्यातील महाविद्यालयांनाही पसंती दिली आहे. त्यातच, यंदाच्या संपूर्ण शैक्षणिक वर्षावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी दूरचा प्रवास करत जायला लागू नये. दूरच्या प्रवासात पाल्याला त्रास होऊ शकतो, या भीतीने अनेक पालक आपल्या पाल्याला स्थानिक अर्थात जवळपासच्या चांगल्या महाविद्यालयांत प्रवेश मिळावा, याच विचारात आहेत. त्यामुळे यंदा मुंबई गाठण्यापेक्षा ठाण्यातील महाविद्यालयांनाच पालक-विद्यार्थी पसंतीक्रम देत आहेत.
निकाल चांगला लागल्याने सर्वच महाविद्यालयांचे कटआॅफ पाच ते सहा टक्क्यांनी वाढणार, हे नक्की. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पालक आपल्या पाल्याला जवळपासच्याच महाविद्यालयांत प्रवेशासाठी इच्छुक दिसत आहेत, जेणेकरून अडचणीच्या काळातही त्यांना महाविद्यालय गाठणे सोपे होईल. याचा परिणाम अॅडमिशनच्या कटआॅफवर नक्की होईल. - चंद्रशेखर मराठे,
प्राचार्य, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे
शाखानिहाय उपलब्ध जागा : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत प्रवेश देण्याचे निश्चित झाले आहे. यासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ११वीच्या प्रवेशासाठी जिल्ह्यात कला शाखेच्या १५ हजार ३३0, तर वाणिज्य शाखेच्या सर्वाधिक ५५ हजार ६६0 जागा रिक्त आहेत. वाणिज्य शाखेकडे कल जास्त असल्यामुळे या जादा जागांचे नियोजन शिक्षण विभागाने आधीच केले आहे. या खालोखाल विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन ३९ हजार १२0 जागा रिक्त आहेत. एचएसव्हीसी या विभागासाठी एक हजार २0 जागा रिक्त आहेत.
ठाणे जिल्ह्यातील कॉलेजांमध्ये अकरावीच्या
एक लाख ११ हजार १४0 जागा उपलब्ध
सुरेश लोखंडे
ठाणे : दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एक लाख १७ हजार ९७0 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ११ वीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये प्रवेश देण्यासाठी तब्बल एक लाख ११ हजार १४0 जागा जिल्ह्यातील महाविद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत.
अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया महाविद्यालयांत सुरु आहे. या ठिकाणी मार्गदर्शन केंद्रांचे नियोजनही करण्यात आले आहे. प्रवेशापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनी सांगितले. उपलब्ध जागांची संख्या पाहता एकाही विद्यार्थ्यास जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज नाही. काही विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेकडे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन, ११ वी प्रवेशाचे आॅनलाइन नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.