विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 05:18 AM2018-04-22T05:18:07+5:302018-04-22T05:18:07+5:30

पालिका प्रशासन उदासीन : खासगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणाच नाही

Students safety in the wind | विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर

Next

भार्इंदर : गेल्या २०१२ पासून मीरा-भार्इंदर महापालिकेने शिक्षण विभागाच्या माध्यमातून शहरातील सर्व खाजगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाकडे पाठपुरावा सुरू केला. मात्र, आजही बहुतांश खाजगी शाळांत ही यंत्रणाच बसवली नसल्याचे उघड झाले असून ती बसवण्यासाठी पालिका अपघाताची वाट पाहणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
पालिका क्षेत्रात सुमारे चारशेहून अधिक खाजगी शाळा आहेत. त्यात २३२ प्राथमिक, १२५ माध्यमिक, बारावीपर्यंतच्या खाजगी शाळांची संख्या ४५ व १२ महाविद्यालये व दोन तंत्र महाविद्यालयांचा समावेश आहे. २०१२ मध्ये मंत्रालयातील आगीच्या घटनेनंतर शहरातील खाजगी शाळांत अग्निरोधक यंत्रणा बसवली नसल्याचा मुद्दा चव्हाट्यावर आला. प्रशासनाने अग्निशमन विभागाला सर्व खाजगी शाळांचे फायर आॅडिट करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या मोठ्या खाजगी शाळा सोडल्यास बहुतांश शाळांत अग्निरोधक यंत्रणाच बसवली नसल्याचे समोर आले. त्यांना अग्निरोधक यंत्रणा बसवण्याची सक्ती करण्यासाठी अग्निशमन विभागाने त्या शाळांचा पाणीपुरवठाच खंडित करण्याचे पत्र पाणीपुरवठा विभागाला दिले.
केवळ कागदी घोडे नाचवण्याखेरीज पालिकेने ठोस कार्यवाही न केल्याने आजही बहुतांश खाजगी शाळांत अग्निरोधक यंत्रणाच नाही. काही शाळांनी केवळ अग्निरोधक सिलिंडर बसवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील कित्येक खाजगी शाळा स्वतंत्र इमारतीत नसून त्या रहिवासी इमारतीत सुरू आहेत.
खाजगी शाळा स्वतंत्र इमारतीत असाव्यात, यासाठी राज्य सरकारने अनेकदा नियम केले, तर पालिकेनेदेखील त्यावर ऊहापोह केला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून आजही रहिवासी इमारतीत शाळा सुरूच आहेत. अशा इमारतीतील शाळांना अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात अडचण होत असल्याने त्यांनी केवळ अग्निरोधक सिलिंडरवरच आपली सुरक्षा मर्यादित ठेवली आहे. त्यातच सिलिंडरची संख्याही पुरेशी
नाही.
पालिकेनेही आपल्या अखत्यारीतील ३५ शाळांमध्ये अग्निरोधक सिलिंडर बसवल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. काही खाजगी शाळा अशा अडगळीच्या ठिकाणी आहेत की, तेथे एखादी दुर्घटना घडल्यास सुरक्षा यंत्रणेला बचावकार्यात अडथळा येऊ शकतो. यावर प्रशासनाने कारवाई न केल्याने शाळा व्यवस्थापनानेसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले.

मोठ्या व स्वतंत्र इमारत असलेल्या खाजगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे. रहिवासी इमारतीमधील खाजगी शाळांमध्ये अग्निरोधक सिलिंडर बसवण्यात आले आहेत. यानंतरही ज्या शाळांनी अग्निरोधक यंत्रणा बसवलेली नाही, त्याचा आढावा घेऊन ती यंत्रणा बसवण्यासाठी कार्यवाही केली जाईल.
-दीपक पुजारी, उपायुक्त, अग्निशमन विभाग

दोन वर्षांपूर्वी सुमारे ७० खाजगी शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा बसवली नसल्याचे उघड झाले होते. त्यांना सतत नोटीस बजावून ती यंत्रणा बसवण्यास भाग पाडले. काही शाळांनी तीबसवली नसल्यास त्यांना विभागप्रमुखांमार्फत नोटीस पाठवून ती बसवण्याची कार्यवाही पुन्हा सुरू केली जाईल.
- सुरेश देशमुख, सहायक अधिकारी, शिक्षण विभाग

Web Title: Students safety in the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा