विद्यार्थ्यांचे वृक्षबंधन, झाडांना बांधली राखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 01:21 AM2018-08-24T01:21:56+5:302018-08-24T01:22:26+5:30
टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या राख्या बांधून ‘झाडे जगवा, झाडे वाचवा’चा संदेश
ठाणे : शालेय विद्यार्थ्यांनी गुरुवारी राममारुती रोड येथील झाडांना राखी बांधून जणू वृक्षबंधनच साजरे केले. यावेळी त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या राख्या बांधून ‘झाडे जगवा, झाडे वाचवा’चा संदेश ठाणेकरांना दिला. न्यू इंग्लिश स्कूल आणि नेचर अॅक्टिव्हिटीज फॉर सस्टेनेबल अॅपरोच (नासा) यांच्या संयुक्त विद्यमाने हे अनोखे रक्षाबंधन साजरे झाले.
शहरात होत असलेली वृक्षांची कत्तल लक्षात घेता विद्यार्थ्यांनी वृक्षतोड थांबवण्याचे आवाहन करून संकटात सापडलेल्या झाडांना पर्यावरणपूरक राख्या बांधून ‘तुम्ही झाडांना वाचवा, ते तुम्हाला वाचवतील’ असा संदेश दिला. झाडांसाठी राख्या तयार करताना त्यांनी गवत, झाडांची पाने, नारळाच्या करवंट्या, सुतळी या टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून राख्या तयार केल्या. विशेष करून मिकीमाउस, पंखा, निसर्ग, झाड, तिरंगा या प्रकारांच्या राख्या होत्या. झाडांना भाऊ मानून आनंद झाल्याच्या भावना यावेळी चिमुकल्यांनी व्यक्त केल्या.
वृक्षांना राखी बांधून आनंद झाला असल्याची भावना इयत्ता सातवीच्या अंकिता शेंगळे हिने व्यक्त केली. झाडांना राखी बांधण्यासाठी मी पानांची राखी तयार केली.
प्रदूषणापासून झाडे आपले रक्षण करतात, त्यामुळे त्यांनाही राखी बांधली पाहिजे, असे सातवी इयत्तेतील पार्थ मोरे याने सांगितले.
यावेळी शाळेचे विश्वस्त आल्हाद जोशी, जलशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद साळसकर, मुख्याध्यापक भानुदास तुरूपमाने, नासाचे राजीव डाके, प्रशांत सिनकर, प्रतिभा काटकर, राजेश आखडमल, पी.आर. टोम्पे आदी उपस्थित होते.