विद्यार्थ्यांना तीन महिने उशिराने मिळणार शैक्षणिक साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:44 AM2021-08-14T04:44:57+5:302021-08-14T04:44:57+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ३० हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी दरमहा २०० रुपये देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता घरूनच ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ३० हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी दरमहा २०० रुपये देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता घरूनच शिक्षण घेणाऱ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश, स्वेटरसह इतर साहित्यदेखील देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला जून महिन्यात झालेल्या महासभेत मंजुरी मिळाली होती. आता या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार असून, त्यानंतरच या साहित्याचा खर्च विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यावर सात कोटी ९९ लाख ८९ हजार ९१६ रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये आजघडीला सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु, मागील वर्षीपासून कोरोनामुळे त्यांना शाळेत जाताच आलेले नाही. त्यामुळे यंदा महापालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण घेता यावे, या उद्देशाने ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणासाठी रोजच्या रोज हजर राहतील, अशांच्या बँक खात्यात दरमहा २०० रुपये जमा केले जात आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेतदेखील मंजूर झाला आहे. तसेच ऑनलाईन शिक्षण घेताना या विद्यार्थ्यांकडे वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध असावे, गणवेश, स्वेटर आदी साहित्यदेखील असावे, या उद्देशाने शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्याचा खर्च त्यांच्या बॅंक खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने यापूर्वीच शैक्षणिक साहित्याचा खर्च हा त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार महापालिकेने मागील काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात अनुदान जमा करण्यास सुरुवात केली आहे.
आता शाळा बंद असल्यातरी त्या सुरू झाल्यास पुन्हा ऐनवेळेस विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साहित्य नाही, म्हणून आबाळ होऊ नये, या उद्देशाने शिक्षण विभागाने त्यासाठीचे अनुदान विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा ठामपाने निर्णय घेतला आहे. यासाठी सात कोटी ९९ लाख ८९ हजार ९१६ रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. असे असले तरी शाळा सुरू होऊन आता जवळजवळ दोन महिने उलटून गेले आहेत. त्यानंतर आता हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष खात्यात ही रक्कम जमा होण्यास सप्टेंबरचा कालावधी उजाडणार आहे. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांच्या हाती उशिरानेच शैक्षणिक साहित्य पडणार आहे.
.......
यासंदर्भातील प्रस्ताव आता स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. तो मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे पैसे खात्यात जमा केले जातील.
(योगेश जाणकर, सभापती, शिक्षण मंडळ - ठामपा)