स्मार्ट सिटीसाठी समिती करणार बार्सिलोनाचा अभ्यास
By admin | Published: March 21, 2016 01:24 AM2016-03-21T01:24:54+5:302016-03-21T01:24:54+5:30
राज्यात स्मार्ट सिटी संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवताना कोणती आव्हाने आहेत, त्याचा सामना कशा पद्धतीने करता यावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करावा
ठाणे : राज्यात स्मार्ट सिटी संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवताना कोणती आव्हाने आहेत, त्याचा सामना कशा पद्धतीने करता यावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करावा, यासाठी राज्याच्या वतीने माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के. गौतम, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी कौस्तुभ धावसे यांचे शिष्टमंडळ बार्सिलोना शहराच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत देशातील शहरांच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना मांडण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीची ही संकल्पना प्रभावीपणे कशी अमलात आणता येईल, त्यासाठी कोणती आव्हाने आहेत, त्यावर कशी मात करता येईल आणि राज्यातील शहरांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याबाबत हे शिष्टमंडळ बार्सिलोना शहराचा अभ्यास करणार आहे.
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने माहिती तंत्रज्ञान, नागरी विकास, ई-गव्हर्नन्स, नागरिकांसाठी पारदर्शी सेवा हमी आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली असून त्याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.
१७ ते २१ मार्च या कालावधीत या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)