सावरकर विरोधाचा प्रतिवाद करण्यासाठी अभ्यास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:40 AM2019-07-25T00:40:20+5:302019-07-25T00:40:26+5:30
सच्चिदानंद शेवडे : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ पुस्तकाचे प्रकाशन
डोंबिवली : विरोध करणाऱ्यांनाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पटले असते; मात्र त्यांचे हिंदुत्व आड येते. आता हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर असल्याने विरोधकांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे बुद्धिवाद आणि विज्ञानवादी सावरकरांची गाळीव वाक्ये घेऊ न त्यातून लोकांसमोर मर्यादित सावरकर मांडण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी तरुणांनी सावरकर विचारांचा अभ्यास करून उत्तर दिले पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते, लेखक सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, डोंबिवली आणि पै फे्र ण्ड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय जोगलिखित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर- आक्षेप आणि खंडन’ पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शनिवारी टिळकनगर शाळेच्या पेंढरकर सभागृहात पार पडला. त्यावेळी शेवडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पै फ्रेण्ड्स लायब्ररीचे पुंडलिक पै, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्रीकांत पावगी, अक्षय जोग आदी उपस्थित होते.
शेवडे म्हणाले की, सावरकरांना जाऊन अर्धशतक झाले आहे. तरीही, त्यांचे विचार आणखी लोकांपर्यंत जात आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे सरकार सत्तेत आहे. पूर्वी प्रिंट मीडिया, लिखाणाच्या क्षेत्रात डाव्या विचारांचे प्राबल्य होते. आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये
उजव्या हातांचे प्राबल्य असल्याने विरोधकांना जशास तशी उत्तरे मिळत आहे. सावरकर नास्तिकवादी कसे होते, हे सांगण्यासाठी सावरकरांचा बुद्धिवाद आणि विज्ञानवाद यातील सोयीस्कर वाक्ये निवडून ती लोकांसमोर मांडली जातात. त्यांना छेद द्यायचा असल्यास सावरकर वाचले पाहिजेत. एखादी गोष्ट नाकारणे सोपे असते; पण ती स्वीकारली तर अभ्यास करावा लागतो. त्यामुळे सोशल मीडियावर सावरकरांच्या विचारांना स्वीकारणारी तरुण मंडळी गोंधळलेली दिसते, असे त्यांनी सांगितले.
शेवडे यांनी अक्षय यांचे कौतुक करताना तरुण लेखकांनी संदर्भ देऊन लिखाण केले पाहिजे. आज समाजाला सावरकरांच्या विचारांची अधिक गरज असल्याचेही ते पुढे म्हणाले.
विशेष घटना, दुर्मीळ छायाचित्रांचा उल्लेख
अक्षय जोग म्हणाले की, सावरकरांच्या माझी जन्मठेप या आत्मचरित्राचे वाचन केल्यावर आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली. त्यानंतर, झपाट्याने सावरकर चरित्र वाचण्यास सुरुवात केली. पुस्तकांत आतापर्यंत घेतलेल्या आक्षेपांचे सप्रमाण खंडन केले आहेच, शिवाय सावरकरांच्या जीवनातील काही विशेष घटनांचा, दुर्मीळ छायाचित्रांचा आणि त्यांच्यावरील इतर देशांत प्रकाशित झालेल्या साहित्याचा उल्लेखही पुस्तकांत संदर्भ म्हणून केलेला आहे.