आधारवाडी डम्पिंगवरून रंगली स्टंटबाजी, सत्ताधारी शिवसेना, मनसे, काँग्रेसची आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:01 AM2018-03-13T04:01:14+5:302018-03-13T04:01:14+5:30

डम्पिंग हटवण्याच्या मागणीसाठी महापालिकेती सत्ताधारी शिवसेनेने देखील सोमवारी आयुक्त कार्यालयावर धडक दिली. या वेळी त्यांच्या दालनाला कुलूप असल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने तेथे ठिय्या धरला.

Stunts ranging from base wadi dumping, ruling Shivsena, MNS, Congress movements | आधारवाडी डम्पिंगवरून रंगली स्टंटबाजी, सत्ताधारी शिवसेना, मनसे, काँग्रेसची आंदोलने

आधारवाडी डम्पिंगवरून रंगली स्टंटबाजी, सत्ताधारी शिवसेना, मनसे, काँग्रेसची आंदोलने

Next

कल्याण :  उन्हाळ्याला सुरुवात होताच शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. आगीच्या धुरामुळे श्वास कोंडत असल्याने त्रस्त नागरिकांनी महापालिका प्रशासनाला टीकेचे लक्ष्य केले आहे. परंतु, आग विझवण्यासाठी प्रशासन प्रयत्न सुरु ठेवले आहेत. आयुक्त पी. वेलरासू यांनी सकाळी डम्पिंग ग्राउंडवर तळ ठोकला असताना सत्ताधारी शिवसेनेपाठोपाठ मनसे आणि काँग्रेसने याप्रश्नी आंदोलनाची स्टटंबाजी करत आयुक्तांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपा आणि राष्ट्रवादीने याप्रश्नी मौन बाळगले आहे.डम्पिंग हटवण्याच्या मागणीसाठी महापालिकेती सत्ताधारी शिवसेनेने देखील सोमवारी आयुक्त कार्यालयावर धडक दिली. या वेळी त्यांच्या दालनाला कुलूप असल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने तेथे ठिय्या धरला.
शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, महिला आघाडीच्या विजया पोटे, नगरसेविका छाया वाघमारे, नगरसेवक महेश गायकवाड, मोहन उगले, रवि पाटील यांनी आयुक्तांना भेटीसाठी बोलवा, असा आग्रह धरला. मात्र, अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झाली तरी आयुक्तांनी पदाधिकाºयांचा फोनही घेतला नाही. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांच्याशी संपर्क साधला. आयुक्तांशी संपर्क साधून त्यांना पाचारण करावे, अशी मागणी त्यांनी केली. परंतु, आयुक्तांचा फोन लागत नसल्याने शिष्टमंडळाने अखेरीस अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या दालनाकडे मोर्चा वळविला. त्यावर घरत म्हणाले, आयुक्त हे डम्पिंग ग्राउंडवर आहेत. तसेच आग विझवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची त्याची माहिती दिली.
आयुक्त कोणत्याही पक्षाला भेटणार नाहीत, तर कसे चालेल. आम्ही आमच्या घरची कामे घेऊन आलो नाहीत. डम्पिंगचा प्रश्न हा जनतेचा आहे. नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आले आहेत. कोणी गल्ली-बोळातील लोक नव्हेत. लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी ते त्यांना पाठ दाखवत असतील तर अशा आयुक्तांनी येथून निघून जावे. त्यांची बॅग घेऊन आम्ही त्यांना पोहोचवू, असा सल्ला साळवी यांनी दिली. आयुक्त शिष्टमंडळास भेटायला न आल्याने त्यांच्या बदलीची मागणी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे करणार आहोत, असेही ते म्हणाले.
नगरसेवक अरविंद मोरे म्हणाले, समुद्रातील तेलविहिरींना लागलेल्या आगी विझतात. डम्पिंगला लागलेली आग विझत का नाही. आयुक्तांविरोधात अविश्वासाचा ठराव महासभेत आणला जाईल. तर वाघमारे यांनी, डम्पिंगची आग विझविण्यासाठी पिण्याचे पाणी वापरल्याने नागरिकांच्या घरात पाणी नाही. उगले यांनी सांगितले की, चार वर्षांपासून अर्थसंकल्पात आग विझविण्यासाठी तरतूद केली जात आहे. हा पैसा कुठे खर्च करतात. अधिकाºयांची मानसिकताच नाही की डम्पिंग हटवले जावे. त्यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या शिष्टमंडळात महापौर नव्हते. शिवसेना सत्तेवर असतानाही त्यांना शिष्टमंडळ घेऊन आयुक्तांना भेटावे लागते. तसेच त्यांच्या पदाधिकाºयांना आयुक्त भेटत नसल्याने भाजपाने चांगलेच तोंडसूख घेतले. शिवसेनेवर ठिय्या आंदोलनाची वेळ का आली, असा बोचरा सवाल भाजपाने केला आहे.
>मनसेने घातला बांगड्यांचा हार
आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला लागणाºया आगीच्या धुरामुळे शहरातील नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे. मात्र, त्यावर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सोमवारी दुपारी मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त दालनात धाव घेतली. परंतु, ते अनुपस्थित असल्याने दालनाच्या प्रवेशद्वारावर आयुक्तांची प्रतिमा चिटकवून त्यालाच बांगड्यांचा हार घालत ढिम्म प्रशासनाचा मनसेने जाहीर निषेध केला. या वेळी ‘आयुक्त हटाव, महापौर खूर्ची खाली करा,’ अशी घोषणाबाजी केली.
मनसेचे कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, माजी आमदार प्रकाश भोईर, ज्येष्ठ नेते काका मांडले, उल्हास भोईर, मनसेने नगरसेविका कस्तुरी देसाई, महिला आघाडीच्या उर्मिला तांबे, मनीषा डोईफोडे, शीतल विखणकर आदींनी हे आंदोलन केले.
मांडले म्हणाले, डम्पिंग चार दिवसांपासून आगीने धुमसते आहे. त्याच्या धुरामुळे नागरिकांचा श्वास कोंडला आहे. मात्र, आयुक्तांना भेटण्यास गेलेल्या नागरिकांना त्यांनी तीन दिवसांपुरते स्थलांतर करा, असा सल्ला दिला. काम करता येत नसेल तर आयुक्तांनी खुर्ची सोडावी. डम्पिंग प्रश्नावर उपाययोजना करण्याऐवजी एका कार्यकारी अभियंत्याच्या मुलाच्या लग्न सभारंभात ते पंगत झोडत बसले आहेत. शहरातील समस्यांशी त्यांचे काही एक देणेघेणे नाही. खुशाल त्यांनी निघून जावे. मनसेच्या पदाधिकाºयांनी डम्पिंगप्रश्नी भेटीची वेळ मागितली असता त्यांना ती दिली नाही. त्यांच्या या कृतीच्या निषेधार्थ महिला आघाडीने त्यांच्या दालनाबाहेर त्यांच्या प्रतिमेला बांगड्याचा हार घालून निषेध केला. यात आम्हाला काही गैर वाटत नाही. प्रशासनाने डम्पिंग ग्राउंडप्रकरणी तातडीने तोडगा न काढल्यास मनसे यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मांडले यांनी दिला.
>प्रशासनच जबाबदार-महापौर
डम्पिंगला लागलेल्या आगीला प्रशासन जबाबदार आहे. महासभेत आणि स्थायी समितीत कचरा प्रकल्पासाठी सगळे आवश्यक ठराव मंजूर केले जातात. तसेच त्याच्या निविदा प्रक्रियांना मान्यता दिली जाते. ढिम्म प्रशासनामुळे त्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे आज नागरिकांना डम्पिंगच्या आगीच्या धुराचा त्रास सहन करावा लागला, अशी प्रतिक्रिया महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.
>काँग्रेसचा रास्ता रोको, कचरा गाड्या अडवल्या
आधारवाड डम्पिंग हटवण्याच्या मागणीसाठी सोमवारी युवक काँग्रेसचे पदाधिकारी राहुल शर्मा, महिला कार्यकर्त्या शमीम शेख आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी डम्पिंग परिसरात २० मिनिटे ‘रास्ता रोको’ केला. या वेळी डम्पिंगकडे जाणाºया कचरा गाड्या रोखण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी डम्पिंग हटावचा नारा दिला. महापालिका प्रशासनाविरोधातही घोषणाबाजी केली. डम्पिंगविरोधात रविवार रात्रीपासून दुसरा रास्ता रोको होता. त्यामुळे राजकीय पक्ष डम्पिंग हटावसाठी आक्रमक झाले आहेत. महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी शिवसेना-भाजपला हा प्रश्न सोडवता आलेला नाही. त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे महापौरांनीही खुर्ची रिकामी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
>‘तीन दिवसापुरते स्थलांतर करा’
आयुक्त पी. वेलरासू यांनी हे डम्पिंगची पाहणी करण्यासाठी गेले असताना काही नागरिकांनी तेथे त्यांची भेट घेतली. या वेळी चर्चेदरम्यान दम्याचा त्रास असणाºया दोन नागरिकांना तीन दिवसांसाठी दूर हलवा, असे वक्तव्य आयुक्तांनी केले. मात्र, आयुक्तांनी त्यांची जबाबदारी झटकून असा सल्ला कसा दिला, असा सवाल करत आयुक्तांविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर मनसे आणि काँग्रेसने टीकेची झोड उठवली आहे. आयुक्तांचे हे विधान काम न करता फुटकचा सल्ला देणारे असे आहे, अशी टीका केली आहे. दरम्यान, प्रशासनाने आयुक्तांच्या सल्ल्याच्या विपर्यास केला आहे. त्यामुळे आयुक्तांचा हेतू आणि उद्देश नागरिकांना दुखावण्याचा नव्हता. आयुक्तांच्या वक्तव्याचा कोणी विपर्यास करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
>केडीएमसीतर्फे तीन उपायुक्त, अभियंत्याची टीम तैनात
डम्पिंगची आग विझविण्यासाठी आयुक्तांनी सोमवारी सकाळपासून चार तास तेथे तळच ठोकला होता. आगीच्या ठिकाणी रविवारी रात्रीही त्यांनी बरावेळ भेट दिली होती. आग विझविण्याच्या कामासाठी तीन उपायुक्त आणि तीन कार्यकारी अभियंत्यांची टीम तैनात केली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे आठ टेंडर कार्यरत आहेत. कल्याण खाडीतील पाणी दोन पाइपद्वारे तसेच आधारवाडी सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी उचलून ते फवारले जात आहे. डम्पिंगमध्ये १५ लाख घनमीटर मेट्रीक टन कचरा आहे. त्यातून बाहेर पडणाºया मिथेन वायू हा सूर्याच्या सानिध्यात आल्याने तो त्वरित पेट घेतो. त्यामुळे आग लागत आहे. त्यावर बºयापैकी नियंत्रण मिळविण्यात महापालिकेस यश आले आहे. धुमसत्या आगीवर सतत पाण्याचा मारा केले जात आहे. घटनास्थळी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनीही आयुक्तांसह भेट दिली. घटनास्थळी कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गाला डोळे जळजळणे, मळमळणे, असा त्रास झाल्याची माहिती मनसेने दिली. मात्र, त्याचा प्रशासनाने इन्कार केला आहे.

 

Web Title: Stunts ranging from base wadi dumping, ruling Shivsena, MNS, Congress movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.