सुडवृत्तीने वर्गातील विद्यार्थ्यास केली मारहाण चार विद्यार्थ्यांविरोधात पोलीसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 09:29 PM2018-10-06T21:29:25+5:302018-10-06T21:49:02+5:30
भिवंडी: लहान भावास चार दिवसांपुर्वी मारहाण केल्याचा सुड घेण्यासाठी शहरातील सलाउद्दीन आयुबी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वर्गात चार विद्यार्थ्यांनी मिळून एका विद्यार्थ्यांस मारहाण केल्याचा प्रकार घडला असुन पोलीसांनी आद्याप आरोपींना अटक केली नाही.या घटनेमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील शांतीनगर परिसरात सलाउद्दीन आयुबी इंग्लिश व उर्दू माध्यमाच्या शाळेच्या संकुलात ही घटना घडली असुन शाळेच्या आवारात मुलांच्या होणाऱ्या भांडणामुळे शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेच्या सर्व वर्गात व परिसरांत सीसी टिव्ही कॅमेरे लावलेले आहेत. इयत्ता दहावी अ या वर्गात शिकणारा विद्यार्थी रिजवान अब्दुल कयुम खान(१६) हा विद्यार्थी दुपारी तीन वाजता मधल्या सुट्टीत दहावी ब च्या वर्गातील विद्यार्थ्यांंसोबत बसला असताना त्या ठिकाणी दहावीत शिकणारी चार-पाच विद्यार्थ्यांचे टोळके आले. त्यांनी वर्गाला आंतून कडी लावली आणि त्यापैकी एकाने आपल्या लहान भावाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारीत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर चौघांनी मिळून रिजावनला सायकलची चैन,कंबरेचा पट्ट्याने केली. या दरम्यान एकाने कंपासमधील कर्कटकने हल्ला करीत शरीरावर गंभीर जखमा केल्याने रिजवान वर्गातच बेशुध्द पडला. त्यामुळे मारहाण करणा-या टोळक्याने वर्गातून पळ काढला.
ही घटना शाळा व्यवस्थापनास समजताच त्यांनी रिजवानच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांच्याकडे रिजवानला सोपविले. त्यांनी जवळच असलेल्या अपना हॉस्पिटल, इंदिरागांधी हॉस्पिटल नंतर प्राईम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्यानंतर देखील रिजवान शुध्दीवर आला नाही. त्यास मुंबईतील माझगाव येथील प्रिन्स अलीखान हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तब्बल दहा तासानंतर तो शुध्दीवर आला. त्यानंतर पोलीसांनी त्याच्याकडून माहिती घेत आफान शेहजान खान,अब्दुल रहिम शेख,आफताब जुबेर अहमद शेख,जैद या चार विद्यार्थ्यांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शाळेतील वर्गात सीसीटिव्ही कॅमेरा लावलेला असल्याने मारहाणीचा घटनाक्रम त्यामध्ये चित्रीत झाला आाहे. त्यानुसार पोलीस आरोपींचा शोध घेत असुन पोलीसांनी आद्याप कोणासही अटक केलेली नाही,अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांनी दिली आहे.