सुभाष भोईर यांना अटकेची शक्यता

By admin | Published: January 16, 2016 12:34 AM2016-01-16T00:34:14+5:302016-01-16T00:34:14+5:30

दिवा गावातील बाळाराम म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी सूत्रधार आणि मारेकऱ्यांतील संभाषणाचा महत्त्वाचा दुवा हाती आल्याने आणि त्यात शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर

Subhash Bhoir arrest likely | सुभाष भोईर यांना अटकेची शक्यता

सुभाष भोईर यांना अटकेची शक्यता

Next

- जितेंद्र कालेकर,  ठाणे
दिवा गावातील बाळाराम म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी सूत्रधार आणि मारेकऱ्यांतील संभाषणाचा महत्त्वाचा दुवा हाती आल्याने आणि त्यात शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांचा सहभाग अधिक स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती विश्वसनीय पोलीस सूत्रांनी दिली.
दरम्यान, २५ वर्षांपूर्वीच्या या खून प्रकरणात भोईर यांच्याबरोबर अटक झालेल्या महेंद्रकुमार मिश्रा उर्फ मुन्ना याचाही खून झाल्याची माहिती मिळाल्याने आता त्या खुनाचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे.
खून झाला तेव्हा बाळाराम म्हात्रे यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून सुभाष भोईर, महेंद्रकुमार आणि शरद भगत यांना अटक झाली होती. मात्र त्यातील आरोपींच्या सहभागाचे पुरावे पोलिसांना मिळाले नव्हते. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या या तिघांना पुरेसा पुरावा नसल्याने सोडून देण्यात आले आणि प्रकरणाची फाइल बंद करण्यात आली. प्रकरण न्यायालयातही गेले नव्हते. मात्र नव्याने तपासात या खुनाचे धागेदोर मिळाले. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने १६ मार्च १९९० रोजी झालेल्या या खून प्रकरणात उत्तर प्रदेशातील औराव गावचा माजी सरपंच अनिल चौबेला २५ डिसेंबरला अटक केली. पाठोपाठ म्हात्रे यांच्यावर गोळीबार करणारा उदयभान सिंग यालाही ११ जानेवारीला अटक झाली. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत.
या दोघांच्या चौकशीत आणखीही काही नावे समोर आली आहेत. यात उदयभान आणि सुभाष भोईर यांच्यात तेव्हापासून आतापर्यंत झालेला संवाद तपासात उघड झाला. हल्लेखोर उदयभान याने तर भोईर यांच्याकडे वारंवार ‘काम केले’ म्हणून पैसेही मागितले आहेत. ‘काम’ कसले केले आणि पैसे कशाबद्दल मागितले, याच्या सखोल चौकशीची गरज असल्याने भोईर यांना गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त पराग मणेरे आणि युनिट-१ चे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी चौकशीसाठी बोलावले. दोन तास त्यांची चौकशी झाली. या चौकशीबद्दल पोलीस समाधानी नसून त्यांची नव्याने चौकशी केली जाणार आहे. त्यात काही दुवे मिळाल्यास आणि अटकेतील आरोपींनी दिलेल्या माहितीला पूरक संदर्भ सापडल्यास या खुनप्रकरणी नव्याने गुन्हे दाखल केले जातील.

साथीदाराचाही खून
ज्या मुन्नाला २५ वर्षांपूर्वी या खून प्रकरणात अटक झाली होती, त्याचाही खून झाल्याची नवी माहिती तपासात उघड झाली आहे. त्यामुळे या खुनातील पुरावा नष्ट करण्यासाठी मुन्नाचाही खून झाला का, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हत्येशी संबंध नाही!
बाळाराम म्हात्रे यांच्या हत्येशी माझा कोणताही संबंध नाही. उलट, त्यांच्या आणि माझ्या कुटुंबांत चांगले संबंध आहेत.
- आमदार सुभाष भोईर

Web Title: Subhash Bhoir arrest likely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.