संभाजी भिडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 02:07 AM2018-07-20T02:07:11+5:302018-07-20T02:08:41+5:30
रिपब्लिकन पक्षाने केली मागणी; तहसीलदार, पोलिसांना दिले निवेदन
कल्याण : संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्या बेताल वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गुरुवारी रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) केली आहे. याप्रकरणी रिपाइंच्या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार अमित सानप आणि महात्मा फुले चौक पोलिसांना यावेळी निवेदन दिले.
१ जानेवारी २०१८ च्या भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली, पण भिडे यांना अटक का होत नाही, असा सवाल रिपाइंने दिलेल्या निवेदनात केला आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता. वारकऱ्यांच्या जोडीला धारकरी असले पाहिजे. माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते, असे बेताल वक्तव्य करून स्त्रियांचा अवमान केला आहे. अशी वक्तव्ये करून भिडे एक प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. ज्या मनुस्मृतीने देशातील बहुजन समाजाला, स्त्रियांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले होते, अशा मनुस्मृतीचे १९२७ मध्ये महाड येथे दहन करण्यात आले. भिडे यांच्या या बेताल वक्तव्यामुळे समाजासमाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा कुटिल डाव आहे. त्यामुळे भिडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपाइंने केली आहे.
भिडे यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपाइंने दिला आहे. यावेळी दलितमित्र अण्णा रोकडे, भीमराव डोळस, देवचंद अंबादे, मिलिंद बेळमकर, संग्राम मोरे, संतोष जाधव आदी उपस्थित होते.