कंत्राटी कामगारांना उपदान, राज्यातील पहिली महानगरपालिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 09:50 PM2021-06-25T21:50:18+5:302021-06-25T21:51:02+5:30
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगार यांना किमान वेतन तसेच अन्य भत्ते, उपदान मिळावे यासाठी अनेक आंदोलने केली गेली.
मीरा रोड - कंत्राटी कामगारांना किमान वेतन पाठोपाठ उपदान देणारी मीरा भाईंदर ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. कंत्राटी सफाई कामगार म्हणून निवृत्त झालेल्या १८० जणांना उपदानचा धनादेश आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते देण्यात आला. ड वर्गातील महापालिका असून देखील मीरा-भाईंदर महापालिकेने कंत्राटी सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे किमान वेतन पासून उपदान दिल्याने पालिकेचे कौतुक होत आहे. राज्यभरातील अनेक महानगरपालिका नगरपरिषदा आदि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना कायद्याने बंधनकारक असलेल्या किमान वेतनापासून अनेक भत्ते, सुविधा उपदान दिले जात नाही. कंत्राटी कामगारांची पिळवणूक केली जाते . मीरा-भाईंदर महापालिकेत देखील सुमारे दीड हजार कंत्राटी कामगारांना किमान वेतनापासून उपदान आदी दिले जात नव्हते.
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगार यांना किमान वेतन तसेच अन्य भत्ते, उपदान मिळावे यासाठी अनेक आंदोलने केली गेली. कामगार आयुक्तांना पासून शासन दरबारी दाद मागण्यात आली. काम बंद आंदोलन केले गेले. त्यातूनच कंत्राटी कामगारांच्या हक्काचे किमान वेतन देण्यास सुरुवात झाली. पुढे किमान वेतन सह बोनस, सुट्टीचा पगार पि.एफ., ई.एस.आय.सी. हे सर्व कंत्राटी सफाई कामगार यांना पालिकेने दिले.
परंतु कंत्राटी सफाई कामगार निवृत्त झाल्यावर अथवा त्याचा सेवे दरम्यान मृत्यू झाल्यावर उपदान मिळणे कायद्याने हक्क असताना तो मात्र दिला जात नव्हता. उपदान देण्यास ठेकेदाराने आपली जबाबदारी झटकली तर महापालिकेने ठेकेदारची जबाबदारी असल्याचे सांगून हात वर केले होते. उपदान द्यावे लागू नये यासाठी साफसफाईचा ठेका चार वर्षाच्या मुदतीचा देण्याचा निर्णय घेतला व तशा निविदासुद्धा काढण्यात आल्या. परंतु श्रमजीवी संघटनेने मतदानासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर पालिकेने कंत्राटी सफाई कामगारांना उपदान देण्यास मान्यता दिली. शुक्रवार २५ जून रोजी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते लाभार्थी कंत्राटी सफाई कामगार कमलाकर जनार्दन म्हात्रे यांना धनादेश देण्यात आला. यावेळी विवेक पंडित, उपायुक्त डॉ संभाजी पानपट्टे, संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल, उप जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, मीरा भाईंदर अध्यक्ष मंगेश मोरे, सरचिटणीस इरफान शेख आदी उपस्थित होते.
प्रत्येक कामगारास 55 ते 60 हजार मिळणार
सेवा निवृत्त आणि मयत अश्या १८० कंत्राटी कामगार ना उपदानचे धनादेश दिले जात आहेत. प्रत्येक कामगारास सुमारे ५५ ते ६० हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी पालिकेचे १ कोटी पेक्षा जास्त रुपये खर्च होणार आहेत. कंत्राटी कामगारांना किमान वेतनापासून विविध भत्ते, उपदान आदि मंजुरीसाठी उपायुक्त डॉक्टर संभाजी पानपट्टे यांनी महत्वाची भूमिका निभावली. अनेक मोठ्या महापालिका किमान वेतन देत नसताना मीरा भाईंदर महापालिकेने मात्र कायद्याने देय सर्व काही या कंत्राटी कामगारांना दिले आहे. कंत्राटी कामगारांनी सुद्धा चांगले काम करून सतत ३ वेळा स्वच्छतेचा पुरस्कार पालिकेला मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे पंडित म्हणाले. सर्व कामगार एकत्र राहिले म्हणुन आज एवढी मोठी मजल मारता आली. असेच एकत्र राहिलात तर नक्कीच एक दिवस समान काम समान वेतन सुध्दा मिळवू अशी अपेक्षा पंडित यांनी व्यक्त केली.
आयुक्त दिलीप ढोले यांनी निवृत्त कंत्राटी सफाई कामगार यांना शुभेच्छा देताना महापालिकेने आर्थिक भार किती पडेल याचा विचार न करता सफाई कामगार यांचे हित जोपासले आहे. त्यामुळे कामगारांनी सुद्धा आपले शहर, आपली महापालिका समजून चांगले प्रभावीपणे काम करावे. शहर स्वच्छ, सुंदर राहील हे ध्येय ठेवावे असे आवाहन केले.