भुयारी मार्गाचे काम एप्रिलमध्ये पूर्ण?
By admin | Published: January 12, 2017 05:52 AM2017-01-12T05:52:19+5:302017-01-12T05:52:19+5:30
शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि उड्डाणपुलाला पर्याय म्हणून रेल्वे मार्गाखालून बांधल्या जाणाऱ्या भुयारी मार्गाला
राजू काळे / भार्इंदर
शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि उड्डाणपुलाला पर्याय म्हणून रेल्वे मार्गाखालून बांधल्या जाणाऱ्या भुयारी मार्गाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. तब्बल साडेसात वर्षे रखडलेले या पुलाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.
वाहतुक कोंडी फोडण्यासाठी २००९ मध्ये या भुयारी मार्गाला मंजुरी दिली. तत्पूर्वी शहरातील पूर्व-पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी रेल्वे फाटकाचा एकमेव आधार होता. पालिकेने २००५ मध्ये इंदिरा गांधी उड्डाणपूल बांधला. त्यामुळे रेल्वे फाटक बंद झाले. वाहनांची संख्या वाढत गेल्यावर या उड्डाणपुलावर ताण पडू लागला आणि कोंडी वाढू लागली. पुलाशिवाय पर्यायी वाहतुक मार्ग नसल्याने वाहनचालकांना खास करून भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेहून पश्चिमेला जायचे झाल्यास पाच कि.मी.चे अंतर कापावे लागते. त्यामुळे उड्डाणपुलालाही पर्यायी मार्गाचा विचार सुरू झाला आणि त्यातून रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्गाला २००९ मध्ये मंजुरी दिली. सुरुवातीला हा मार्ग बॉक्स पुशिंग पद्धतीने बांधण्याचे ठरविले. त्यासाठी सुमारे साडे नऊ कोटींची तरतूद केली. त्याच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने सल्लागारांच्या सुचनेनुसार आयआयटीमार्फत प्रकल्पाच्या जागेची तपासणी केली. प्रकल्पाच्या जागेत दलदल असल्याने बॉक्स पुशिंगऐवजी मायक्रो टनेल ट्रेन्चलेस पद्धतीचा वापर करण्याची सूचना करण्यात आली. पालिकेने त्यासाठी सुमारे ४३ कोटी ७६ लाखांच्या खर्चाची तरतुद केली. सुमारे ७० मीटर लांबी व १० मीटर रुंदीचा भुयारी वाहतुक मार्ग बांधण्याचे कंत्राट २५ मे २०११ रोजी घई कन्स्ट्रक्शनला दिले. मार्ग पूर्ण करण्याची मुदत मे २०१४ पर्यंत होती.
रेल्वेने १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढवून पश्चिमेस नवीन यार्ड बांधल्याने भुयारी मार्ग सहा मीटर खाली नेण्याची सूचना पश्चिम रेल्वने केली. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने २०१४ मध्ये महासभेने १७ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली. रेल्वेने प्रकल्पाचे काम सुरु करण्यास तब्बल वर्षाने मंजुरी दिल्याने कामाला उशीरा सुरुवात झाली. शिवाय रेल्वेच्या जागेचा वापर केल्यापोटी रेल्वेने पालिकेकडे सात कोटींच्या लेव्हिएबल चार्जेसची मागणी केली. ही रक्कम पालिकेने न भरल्याने रेल्वेने प्रकल्पाचे काम २०१४ पासून बंद पाडले. तब्बल ८ महिने ते बंद होते. अखेर पालिकेने गेल्या वर्षी जानेवारीत रेल्वेकडे तीन कोटी भरल्यानंतर काम सुरु झाले. वाढलेल्या खर्चासाठी पालिकेने २०१५ च्या अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद केली. या मार्गाच्या पश्चिमेकडील निर्गमनाच्या दिशेत शहीद भगतसिंग उद्यानाचा अडसर असल्याचे स्पष्ट झाले. पालिकेने हे उद्यान जमिनदोस्त केले. हे काम एप्रिलमध्ये पूर्ण होणार असल्याचे पालिका सांगते. (प्रतिनिधी)