पर्यावरणप्रेमींच्या जनजागरण उपक्रमाला यश; स्थलांतरित वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 01:52 PM2021-03-07T13:52:48+5:302021-03-07T13:53:05+5:30

मनोरंजनाची साधने उपलब्ध असल्याने व निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी ठाण्यातील तलावांच्या आसपास दिवसरात्र नागरिकांची गर्दी असते

Success of environmental awareness initiatives; Immediate measures will be taken for the protection of migratory wildlife | पर्यावरणप्रेमींच्या जनजागरण उपक्रमाला यश; स्थलांतरित वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करणार

पर्यावरणप्रेमींच्या जनजागरण उपक्रमाला यश; स्थलांतरित वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करणार

Next

ठाणे : ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून सुप्रसिद्ध आहे आजमितीला ठाण्यात ३५ नैसर्गिक तलाव आहेत. दरवर्षी हजारो पाणपक्षी स्थलांतर करून ठाणे खाडी परीसरात तापुरत्या वास्तव्यास येतात. अतिक्रमणे व विविध विकास प्रकल्पांमुळे पाणथळ जागा म्हणजेच त्यांच्याअधिवासाचा झपाट्याने ह्रास होत असल्याने गेले काही वर्षांपासून निवाऱ्याचा शोधात त्यांनी आपला मोर्चा ठाण्यातील तलावांकडे वळविला असल्याचे दिसते. गेली ३ वर्षे कुरव (सीगल्स) पक्षी मोठ्या कळपांमध्ये ठाण्यातील इतिहासकालीन मासुंदा तलावामध्ये आश्रय घेत आहेत. 

अशातच मनोरंजनाची साधने उपलब्ध असल्याने व निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी ठाण्यातील तलावांच्या आसपास दिवसरात्र नागरिकांची गर्दी असते. या नागरिकांना खाद्यसेवा पुरविणारे अनेक अधिकृत-अनधिकृत ठेलेवाले या परीसरात आहेत. भेळपुरी सॅन्डविच दाबेली यासारखे पदार्थ खाऊन झाले कि उरलेले निरुपयोगी खाद्य कचऱ्याच्या डब्यात न टाकता तलावावर विहार करत असलेल्या स्थलांतरित कुरव (सीगल्स) पक्ष्यांना सर्रास टाकले जात आहेत. त्याचप्रमाणे पक्ष्याना खाद्य दिल्याने पुण्यप्राप्ती होते या अंधश्रद्धेतूनही शेव गाठी फरसाण पाव बिस्किटे असे निकृष्ट खाद्य तलावामध्ये फेकले जात आहे. काही नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणेच तलावातील जीवसृष्टीवर व नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. 

याबाबत विविध समाजमाध्यमातून तक्रारी प्राप्त झाल्यावर येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्या संलग्न संस्था तसेच मराठा जागृती मंच, वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन, पर्यावरण दक्षता मंडळ या पर्यावरणवादी संस्थांतर्फे जनजागरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना कुरव पक्ष्यांच्या स्थलांतराबाबत माहिती, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, निकृष्ट अन्न दिल्याने पक्ष्यामध्ये निर्माण होणाऱ्या विकृती, पक्ष्याने प्रक्रिया केलेले अन्न जसे कि पाव, गाठी, बिस्कीट देणे कायद्याने गुन्हा आहे याची समज देणे अशाप्रकारे प्रबोधनाचे कार्य महिनाभर सहयोगी संस्थांचा माध्यमातून संस्था राबवित आहे.

बहुसंख्य नागरिकांकडून या जनजागरण मोहिमेला सकारात्मक प्रतीसाद मिळत असला तरी काही बेजबाबदार नागरिक उद्दामपणे वागतात. दिलेल्या सूचनांचे पालन न करता पक्ष्याना खाणे टाकून नियम कायदे मोडतात. अशा बेजबाबदार नागरिकांबरोबर पर्यावरण कार्यकर्त्यांचे  वारंवार खटके उडण्याचे प्रसंग घडत होते. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाला हानी पोहोचविणार्या लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या ठाणे महानगरपालिकेला याची माहिती देण्यात आली होती.सिगल पक्ष्याना खाणे टाकणे बेकायदेशीर आहेत या आशयाचे या ठिकाणी माहितीपर फलक बसवावेत, सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, स्वच्छता मार्शल्स नेमून दिवसभर कारवाई करावी अशी मागणी येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीतर्फे करण्यात आली होती. परंतु या मागणीकडे गेले आठवडाभर सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत होते. 

ठामपाच्या एक बड्या अधिकाऱ्याकडे ही बातमी पोचल्यानंतर सूत्रे फिरली आणि सकाळी ठामपा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य अधिकारी मनीषा प्रधान यांनी कर्मचार्यांसह वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आजच्या जनजागरण कार्यक्रमात हजेरी लावली. २ दिवसात संपूर्ण तलावाभोवती जागृतीपर फलक लावले जातील व नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन प्रधान यांनी दिले

यावेळी प्रधान यांनी येथे उपस्थित नागरिकांना राज्य सरकारच्या माझी वसुंधरा कार्यक्रमांतर्गत मासुंदा तलावाचे संवर्धन हेतू शपथ दिली. मासुंदा तलाव प्रदूषित करणार नाही व त्याचे संवर्धन करिन अशी शपथ उपस्थितांनी घेतली. यावेळी येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचे समन्वयक रोहित जोशी, मराठा जागृती मंच पानिपत, ठाणे विभाग अध्यक्ष संजय जाधव, सुधाकर पतंगराव पर्यावरण दक्षता मंडळाचे हेमंत नाईक, डब्ल्यूडब्ल्युए चे आशिष साळुंके, निखिल जाधव उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एनसीसी कॅडेटना ठाण्याच्या पर्यावरण रक्षणाची शपथ देऊन जनजागरण उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची सांगता झाली.

देर आये पर दुरुस्त आये

ठाणे शहरातील तलाव व तेथील जैवविविधतेच संरक्षण करण्याच प्राथमिक कर्तव्य हे ठामपा चे आहे. प्रशासकीय यंत्रणा आपलं कर्तव्य पार पाडत नसल्याने पर्यावरणप्रेमी संस्थांनी पुढाकार घेत जनजागरणाचा उपक्रम हाती घेतला. आजच्या कार्यक्रमादरम्यान ठामपा ने आपली उपस्थिती लावत पुढील करवाईबद्दल आश्वस्त केले आहे. त्यामुळे उशिरा का होईना ठामपा ला पर्यावरण रक्षणाबाबत शहाणपण आल्याचे चित्र आतातरी दिसत आहे ज्याचे आम्ही स्वागत करतो. रोहित जोशी - समन्वयक, येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी

Web Title: Success of environmental awareness initiatives; Immediate measures will be taken for the protection of migratory wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.