कळवा उड्डाणपुलाचा ११० टनाचा लोखंडी सांगाडा १४ मीटर उंच बसविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 08:29 PM2021-03-11T20:29:29+5:302021-03-11T20:32:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कळवा खाडीवरील नवीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या कळवा खाडीवरील नवीन उड्डाणपुलावरील १०० मीटर तसेच ११०० टनाचा मुख्य सांगाडा अवघ्या चार तासांमध्ये बसविण्यात ठाणे महापालिकेच्या अभियंत्यांना यश आले आहे. हा सांगाडा बसविल्यामुळे कळवा उड्डाणपूलाच्या कामाला वेग आला असून लवकरच दुसऱ्या टप्याचे कामही पुढील आठवडयामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते.
ठाणे शहर आणि कळवा यांना जोडण्यासाठी तसेच ठाणे शहरामधून नवी मुंबई, कोकण, पुणे तसेच ठाणे बेलापूर मार्गे जाण्यासाठी ठाणे आणि कळवा दरम्यान खाडीवर सुमारे शंभर वर्षापूर्वीचा ब्रिटीशकालीन पूल अस्तित्वात आहे. तो जुना तसेच धोकादायक सप्टेंबर २०१० पासून वाहतूकीला बंद केला आहे. त्यामुळे या ठिकाणी १९९५- ९६ च्या दरम्यान बांधलेल्या पूलाचा सध्या वापर सुरु आहे. ठाणे शहरातील वाहन संख्याही मोठया प्रमाणात वाढली. त्यामुळे या एकाच पुलावर वाहतूकीचा ताण येऊन मोठया प्रमाणात कोंडी होत आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी या नवीन पूलाची उभारणी करण्यात येत आहे.
गुरुवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पूलाच्या खाडीवरील ११०० टनाचा लोखंडी सांगाडा बसविण्यास सुरुवात झाली. यावेळी लॉचींगसाठी बसविलेले तात्पुरत्या आधाराचे वजन १०० मेट्रिक टन आहे. सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान, हा सांगाडा बसविण्याचे काम मोठया कौशल्याने पूर्ण करण्यात आले. या स्पॅन फॅब्रीकेशनचे काम दमणच्या पी.एस.एल.कंपनीमध्ये झाले असून यासाठी वापरलेले विशिष्ट प्रकारचे टेन्शन रॉड हे परदेशातून आयात केले आहेत. हा सांगाडा बसवण्यात आल्यानंतर दुसर्या टप्प्यामध्ये हा सांगाडा १०८ मीटर जमीनीला समांतर सरकवून खाडीमध्ये उभारलेल्या पिलर्सवर ठेवण्यात येणार आहे. दुसरा टप्पा सात दिवसांनंतर सुरु करण्याचे नियोजन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
‘गर्डर बसविण्याचे काम यशस्वीरीत्या झाल्यामुळे सप्टेंबर अखेर हा उड्डाणपूल सुरु होईल. याठिकाणी सकाळी आणि सायंकाळी होणार वाहतूक कोंडी दूर होण्यास आता मोठी मदत होईल.’
- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री
.................तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांचे खरे आभार मानायला हवे. त्यांच्या काळात पाठपुरावा करण्यात आला असून एक स्वप्न पूर्ण होत आहे. दोन शहरांना जोडणारे हे मोठे प्रकल्प आहेत त्यामुळे अवजड वाहने कळव्यात उतरता नवी मुंबईच्या हद्दीत पटनीला उतरण्याची सूचना मी केली आहे.
- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री.