श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला यश; २४ तासानंतर मागण्या मान्य
By नितीन पंडित | Published: March 5, 2024 08:14 PM2024-03-05T20:14:24+5:302024-03-05T20:15:29+5:30
वेगवेगळ्या ठेकेदाराकडे हे कामगार मागील १५ ते २० वर्षांपासून काम करीत आहे.
भिवंडी: महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा विभागातील १२३ कंत्राटी कामगारांना किमान वेतन, पगार स्लीप, भविष्य निर्वाह निधीचा तपशील मिळावा या मागणीसाठी सोमवारी श्रमजीवी संघटनेने पालिका मुख्यालया समोर सुरू केलेले आंदोलन २४ तासांनंतर मागण्या मान्य झाल्याने स्थगित करण्यात आले आहे. पालिकेने पाणीपुरवठा विभागातील वॉलमन, पाईप लाईन व बोअर वेल निगा व दुरुस्ती तसेच फिल्टर प्लांट या ठिकाणी काम करण्यासाठी ठेकेदार नेमून कंत्राटी कामगार म्हणून १२३ जणांची नेमणूक केली आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या ठेकेदाराकडे हे कामगार मागील १५ ते २० वर्षांपासून काम करीत आहे. यासाठी मनपा ठेकेदाराला कोट्यावधी रुपये देत असताना ठेकेदार कंत्राटी कामगारांना तुटपुंजे वेतन देऊन कामगारांची आर्थिक पिळवणूक करत आले आहेत.
या प्रश्नासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने सोमवारी पालिका मुख्यालया समोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.हे आंदोलन मंगळवारी २४ तास पूर्ण झाल्यानंतर अखेर ठेकेदाराने पगार स्लीप व वेतनातील फरक रक्कम दिल्या नंतर स्थगित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी महेंद्र निरगुडा यांनी दिली आहे.
प्रशासन ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचा आरोप
भिवंडी पालिकेने नेमलेल्या बरकत कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास २०२२ पासून वार्षिक रक्कम देऊन त्या माध्यमातून ६४ वॉलमन,पाईप लाईन निगा दुरुस्ती ३०, बोअरवेल निगा दुरुस्ती २५ व फिल्टर प्लांट ७ असे कामगार राबविले जात आहेत.पालिका ठेकेदारास प्रति कामगार २६ हजार रुपये देत असताना ठेकेदार मजूर कामगारांना अवघे १७ ते १८ हजार रुपये देऊन पिळवणूक करीत आहेत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून पालिका या ठेकेदारांना आतापर्यंत पाठीशीच घालत आली आहे असा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केला आहे.