डोंबिवलीच्या काही समस्या सोडवण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:04 AM2019-11-09T00:04:19+5:302019-11-09T00:04:30+5:30
रवींद्र चव्हाण : डोंबिवलीत वनराई प्रदर्शनाचे उद्घाटन; सामाजिक, आध्यात्मिक कार्याबद्दल मान्यवरांचा गौरव
डोंबिवली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी डोंबिवली हे अस्वच्छ शहर असल्याची टीका केली होती. त्यानंतर, या शहरासाठी काय करता येईल, याचा मी सकारात्मक दृष्टीने विचार करू लागलो. कोणतीही तक्रार न करता त्या कशा सोडविता येतील, याचा विचार केला. त्यामुळे या शहराच्या काही समस्या सोडविण्यात यश आले. प्रत्येकाने आपले जॉबकार्ड तयार केले पाहिजे.
महापालिकेचे कर्मचारी काम करतात की नाही, हे नागरिकांनी पाहिले पाहिजे, असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
वनराई प्रतिष्ठानने येथील क्रीडासंकुलात भरवलेल्या चौथ्या वनराई प्रदर्शनाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनीता राणे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नरेंद्र जाधव, नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भानुशाली आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी प्रतिभा बिवलकर, रूपाली शाईवाले, अलका मुतालिक, सुरेखा जोशी यांनी केलेल्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
चव्हाण म्हणाले, ‘डोंबिवली रेल्वेस्थानकावर सर्वाधिक वर्दळ असल्याने प्रथम त्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. स्थानकाच्या बाहेर स्वच्छ अशी वातानुकूलित शौचालये बनविली. स्थानकाच्या भिंती घराच्या भिंतीप्रमाणे सजविल्या. स्थानकात बदल घडावा, यासाठी सतत डीआरएमशी चर्चा केली. त्याचबरोबर शहर कचरामुक्त होण्यासाठी घंटागाड्या सुरू केल्या. कचराकुंड्यांची जागा साफ राहावी, याकरिता घंटागाडी पाच वेळा तेथे गेली पाहिजे, असा प्रयत्न केला. आपली मानसिकता असल्यास शहर आपोआप स्वच्छ होईल.’
ते पुढे म्हणाले, ‘या निवडणुकीत मतदारांनी मला काय करावे, हा धडा दिला आहे. त्यामुळे छोटेमोठे कोणतेही काम असले, तरी ते मी करण्याचा निश्चय केला आहे. डोंबिवलीचा प्रदूषणात चौदावा क्रमांक लागला होता. अनेक सामाजिक संस्थांनी कारखाने हटवा, अशी मागणी केली. तसे केले असते तर ५५ हजार कामगार बेरोजगार झाले असते. डोंबिवली एमआयडीसीला यंदाच्या वर्षी पर्यावरणाचा ‘वसुंधरा पुरस्कार’ मिळाला आहे.’
जगन्नाथ पाटील म्हणाले, ‘पूर्वी डोंबिवलीत दोन मजली इमारती होत्या. आता त्यांची जागा टोलेजंग इमारतींनी घेतली आहे. ही बांधकामे अशीच सुरू राहिल्यास सरकारला त्यावर नियंत्रण आणावे लागेल.’
राणे म्हणाल्या, ‘शहरात वातावरण प्रदूषित असताना आपल्याला झाडे लावण्याची आणि ती जगविण्याची गरज आहे. आपण ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत. पण, त्यासाठी नागरिकांची साथ मिळत नाही. महापालिकेकडे कर्मचारी अपुरे आहेत. त्यामुळे महापालिकेला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे.’
मुतालिक म्हणाल्या, ‘आपले जीवन निसर्गावर अवंलबून असल्याने कृषी प्रदर्शनाची आज गरज आहे. अनेक जण सार्वजनिक ठिकाणी घाण करतात आणि मी एकटा बदलून काय होणार, असा विचार करतात. त्यामुळेच पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी आज शाळा व संस्कारवर्गांवर येऊन पडली आहे. प्रत्येक ठिकाणी शासन पुरे पडू शकत नाही. नागरिकांनी छोट्याछोट्या गोष्टींतून राष्ट्रभक्ती दाखविण्याची गरज आहे.’
पावसामुळे कार्यक्रम रविवारपासून
वनराई प्रतिष्ठानतर्फे कृषी प्रदर्शनादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्कार समारंभ होणार आहेत. परंतु, पावसामुळे दोन दिवसांचे कार्यक्रम पुढे ढकलले असून, रविवारपासून नियमित कार्यक्रम घेण्यात येतील, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.