प्रज्ञा शोध परीक्षेत ठाणेकर विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 06:19 AM2020-06-01T06:19:27+5:302020-06-01T06:19:59+5:30
आॅनलाइन निकाल जाहीर : दुसरी इयत्तेत जिल्ह्यातील ४ विद्यार्थी राज्यातून प्रथम
ठाणे : महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल नुकताच आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. दुसरी इयत्तेसाठी झालेल्या परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील ४ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत राज्यातून पहिला येण्याचा मान मिळवला. त्याचबरोबर सहावी इयत्तेसाठी झालेल्या परीक्षेत कल्याणचा ऋतुज राऊतला ३०० पैकी २९२ गुण मिळाले असून तोही प्रथम आला आहे.
दुसरी इयत्तेच्या निकालात ठाण्याच्या संकेत विद्यालयाची आर्या आदक, भगवती विद्यालयाचा तेजस घैसास, बदलापूरच्या कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूलचा दक्ष पवार आणि कल्याणच्या बा.ल. दळवी बालक मंदिर शाळेतील विभा सरोळकर या चौघांनीही १०० पैकी १०० गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. सहावी इयत्तेच्या निकालात कल्याणच्या के. सी. गांधी हायस्कूलचा ऋतुज राऊत याने ३०० पैकी २९२ गुण मिळवत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
कल्याणच्याच श्री महावीर जैन इंग्लिश स्कूलचा कुणाला राणे हा २७६ गुणांसह चौथा आला आहे. सातवी इयत्तेच्या निकालात डोंबिवलीच्या सिस्टर निवेदिता इंग्लिश मिडीयम स्कूलची वैदेही शेट्ये ही २६८ गुणांसह राज्यात दुसरी आली आहे. त्याच शाळेची इशा लेले ही २५६ गुणांसह १५ वी आणि सेंट थॉमस हायस्कूलचा सुब्रताकुमार पाध्य हा १७ वा आला आहे.
अशी आहे मेरीट लिस्ट
महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेच्या निकालाची मेरीट लिस्ट आॅनजाहीर झाली. दुसरी इयत्तेसाठी झालेल्या परीक्षेच्या मेरीट लिस्टमध्ये ठाणे जिल्ह्यातील १५ मुले आहेत. तिसरी इयत्तेच्या मेरीट लिस्टमध्ये २१, चौथीच्या लिस्टमध्ये ४४, सहावीच्या लिस्टमध्ये २१ तर सातवीच्या लिस्टमध्ये जिल्ह्यातील २० मुले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरच्या विविध शाळांचे हे विद्यार्थी आहेत.