भाजप नेते रवींद्र चव्हाण यांना यश; उल्हासनगर भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर
By सदानंद नाईक | Published: October 19, 2024 08:24 PM2024-10-19T20:24:07+5:302024-10-19T20:24:41+5:30
चव्हाण यांनी एक मनाने निवडणुकीला सामोरे जाऊन विजश्री खेचून आणण्याचे आदेश दिले.
सदानंद नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनीं उल्हासनगर पक्ष कार्यालयात शनिवारी दिवसभर ठाण मांडून स्थानिक पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यां सोबत संवाद साधून एकमेकां विषयी असलेली नाराजी दूर केली. तसेच एक मनाने निवडणुकीला सामोरे जाऊन विजश्री खेचून आणण्याचे आदेश दिले.
उल्हासनगर भाजप उत्तर भारतीय सेलच्या अध्यक्षाने थेट आमदार कुमार आयलानी यांच्यावर आरोप केल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर उत्तरभारतीय सेलच्या अध्यक्षाने वंचित पक्षात प्रवेश करून उमेदवारीची तिकीट मिळविले. पक्षाकडून विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या संख्येत वाढ झाल्याने, पक्ष येते चिंतीत होते. अखेर पक्षनेते रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगर पक्ष कार्यालयात शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत स्थानिक पक्ष नेते व कार्यकर्ते, महिला आघाडी व इतर विविध सेलच्या पदाधिकार्या सोबत संवाद साधून विधानसभा मतदारसंघाबाबत चाचपणी केली. भाजपकडून विद्यमान आमदार कुमार आयलानी व शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी असे दोघेत इच्छुक असून इतर इच्छुकांनी निवडणुकीतून माघार केल्याचे चित्र भाजपच्या बैठकीत उघड झाले. तर शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पक्षनेते रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्या सोबत संवाद साधून त्यांच्या उत्साह भरल्याचे सांगितले.
आयलानी यांना डच्चू?
महाविकास आघाडी कडून ओमी कलानी यांचे नाव निश्चित मानले जात असून महायुतीकडून विधमान आमदार कुमार आयलानी यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र भाजपने आयलानी याना डच्चू देऊन ओमी कलानी याना तिकीट देणार आहे. अशी चर्चा शहरात रंगली. तर दुसरीकडे आमदार कुमार आयलानी हेही बंडखोरी करून महाविकास आघाडीची उमेदवारी घेऊ शकतात. या चर्चेलाही ऊत आला आहे.