श्रमजीवी कामगार संघटनेच्या प्रयत्नांना यश; भिवंडी महापालिकेच्या २७ कंत्राटी कामगारांना मिळाली फरकाची रक्कम
By नितीन पंडित | Updated: January 20, 2023 18:54 IST2023-01-20T18:54:01+5:302023-01-20T18:54:09+5:30
रक्कमेचे धनादेश कामगारांना वाटप केले असल्याची माहिती श्रमजीवी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र निरगुडा यांनी शुक्रवारी दिली आहे.

श्रमजीवी कामगार संघटनेच्या प्रयत्नांना यश; भिवंडी महापालिकेच्या २७ कंत्राटी कामगारांना मिळाली फरकाची रक्कम
भिवंडी :
भिवंडी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातील २७ कंत्राटी कामगारांना श्रमजीवी कामगार संघटनेच्या माध्यमातून तीन वर्षांच्या वेतन फरकाची सुमारे पाच लाख रुपये फरकाची रक्कम पालिका प्रशासनाच्या सहकार्यातून ठेकेदारा कडून मिळवून देण्यात श्रमजीवी कामगार संघटनेला यश मिळाले आहे. या रक्कमेचे धनादेश कामगारांना वाटप केले असल्याची माहिती श्रमजीवी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र निरगुडा यांनी शुक्रवारी दिली आहे.
पालिका पाणीपुरवठा विभागात मागील कित्येक वर्षांपासून पाईप दुरुस्ती,बोअरवेल दुरुस्तीचे काम ठेकेदार मार्फ़त केले जात असून त्यासाठी ठेकेदाराकडून कंत्राटी कामगार नेमण्यात आले आहे .या कामगारांना तुटपुंजा मोबदला ठेकेदार देत असल्याने श्रमजीवी कामगार संघटनांच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून कामगारांच्या न्याय हक्कासाठी या कामगारांचा लढा सुरू आहे. सन २०१९ ते डिसेंबर २०२१ या दरम्यान दिलेल्या वेतानातील फरकासाठी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर,कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल,राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर,जिल्हाध्यक्ष अशोक सापटे शहराध्यक्ष सागर देसक व महेंद्र निरगुडा व मोतीराम नामखुडा यांनी वेळोवेळी आंदोलन करून पालिका प्रशासन कडे पाठपुरावा केला असता त्यास यश मिळवून त्या वेळचे ठेकेदार मेसर्स बुबेरे असोसिएशट यांच्या कडून २७ कामगारांच्या वेतन फरकाची प्रत्येकी १८ हजार ८०० असे एकूण ५ लाख ७ हजार ६०० रुपयांची रक्कम कामगारांच्या हाती सुपूर्द करण्यात आली आहे.कामगारांनी आशा सोडून दिलेली असतानाही संघटनेने कामगारांना न्याय मिळवून दिल्या बद्दल कामगारांनी संघटनेचे पदाधिकारी महेंद्र निरगुडा यांचे अभिनंदन केले आहे.