शहापूर तालुक्यात मक्याच्या शेतीचा प्रयोग यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:37 AM2021-03-07T04:37:02+5:302021-03-07T04:37:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : शहापूर तालुक्यातील तुते या गावातील स्वामी विशे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतीत या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भातसानगर : शहापूर तालुक्यातील तुते या गावातील स्वामी विशे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतीत या वर्षी चक्क मक्याच्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला असून असा हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातील अनेक शेतकरी ही शेती पाहण्यासाठी येत आहेत. कारण केवळ पावसाळ्यात मक्याची लागवड केली जाते. त्यातच ती व्यवस्थित येत नाहीत. मात्र याला आता या शेतकऱ्याने छेद देत ही शेती यशस्वी केली आहे.
भातसा धरणाच्या कालव्यातील पाण्यावर परिसरातील शेकडो शेतकरी शेतीबरोबरच भाजीपाल्याची पिके घेत आहेत. वर्षानुवर्षे एकच पीक, तोच भाजीपाला यामुळे सर्वत्र एकाच प्रकारचे पीक घेतल्याने शेतकऱ्याला त्या उत्पादनात भावही मिळत नाही. उलट व्यापारी त्या शेतकऱ्यांची भावाच्या बाबतीत पिळवणूक करत असतात. मात्र तुते येथील प्रयोगशील शेतकरी विशे हे दरवर्षी आपल्या शेतीत विविध प्रयोग करतात. त्यामुळे त्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे.
यावर्षी त्यांनी आपल्या दोन एकर शेतीत त्यांनी स्वीट कॉर्नची शेती ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून केली आहे. या दोन एकरमध्ये त्यांनी तीनही प्लॉटमध्ये दहा दहा दिवसांचे अंतर ठेवून या पिकाची लागवड केल्याने हे पीक एकापाठोपाठ एक असे निघून त्याचा फायदा शेतकऱ्याला होत आहे.
या दोन एकर जागेत तीन हजार किलो किमतीचे नऊ किलो बियाणे, खत, ठिबक सिंचन यांचा असा एकूण ७० हजार रुपये खर्च झाला आहे.
आता त्यांनी हे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली असून साधारण एक मका सहा रुपयाला विकला जात आहे. त्यांना मागणीही अधिक प्रमाणात आहे. त्यांच्या ७० किलोच्या एका पोत्याला ४०० रुपये भाव मिळत असून त्यांची दररोज सहा पोती बाजारात विक्रीसाठी जातात. त्यातून त्यांना अडीच हजार रुपये मिळतात. आतापर्यंत त्यांनी झालेला खर्च वसूल केला असून आपल्याला या शेतीतून दोन लाख रुपये इतका नफा मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
-------------------
कोट
या शेतकऱ्याने केलेली मक्याची शेती. हा तालुक्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग आहे.
- पंढरीनाथ पाटील, मंडळ कृषी अधिकारी
अशाच प्रकारची शेती तालुक्यात झाल्यास शेतकऱ्यांना वेगळी दिशा मिळण्यास नक्कीच मदत होईल.
- अमोल अगवान, तालुका कृषी अधिकारी
------------------------------------