भातपीक घेणाऱ्या भिवंडीत प्रथमच भुईमुगाची यशस्वी शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 06:32 PM2020-08-10T18:32:23+5:302020-08-10T18:32:57+5:30
तब्बल दीड एकरात भुईमुगाची शेती केली असून हा भिवंडी तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी चांगले पीक आल्याचे पाहिल्याने पुढच्या वर्षी भुईमूगाचे पीक घेण्याचा निर्णय सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे
- नितिन पंडीत
भिवंडी : ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त भातपीक भिवंडी तालुक्यात घेतला जातो, मात्र पावसाचा भरोसा नसल्याने कधी पाऊस कमी तर कधी जास्त. त्यातच शेत मजूर मिळत नाही त्यामुळे मोठी मेहनत घेऊन भातपीक येथील शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी सुद्धा झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये पहारे गावातील तरुण शेतकरी दिपक नारायण भोईर यांनी भुईमुगाच्या शेतीचा पहिला उपक्रम राबवला असून त्यासाठी मातीची तपासणी करून अतिशय चांगल्या प्रकारे भुईमूग लावला असून हे भुईमुगाचे पीक टवटवीत आले आहे. तब्बल दीड एकरात भुईमुगाची शेती केली असून हा भिवंडी तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी चांगले पीक आल्याचे पाहिल्याने पुढच्या वर्षी भुईमूगाचे पीक घेण्याचा निर्णय सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे.
पावसाचा भरोसा नाही तर शेतमजूर मिळत नसल्याने भातपीक घेण्यास अनेक अडचणी येत असल्याने कमी मेहनत आणि पीक जास्त मिळणाऱ्या भुईमुगाच्या पिकाकडे शेतकरी वळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने तरुण शेतकरी दिपक भोईर यांचे पंचक्रोशीत कौतुक करण्यात येत आहे.