भिवंडीत प्रथमच भुईमुगाची यशस्वी शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:11 AM2020-08-11T00:11:30+5:302020-08-11T00:11:34+5:30
भातपीक टाळले; लहरी पावसामुळे निर्णय
- नितीन पंडित
भिवंडी : ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त भातपीक घेतले जाणाऱ्या भिवंडी तालुक्यात यंदा बेभरवशाचा पाऊस, शेतमजुरांची वानवा, लॉकडाऊनमुळे आलेले कर्जबाजारी होण्याचे संकट या पार्श्वभूमीवर पहारे गावातील तरुण शेतकरी दीपक नारायण भोईर यांनी भुईमुगाच्या शेतीचा प्रयत्न केला. त्यासाठी मातीची तपासणी करून अतिशय चांगल्या प्रकारे भुईमूग भोईर यांनी लावले असून यंदा भुईमुगाचे टवटवीत पीक आले आहे. भुईमुगाच्या भरगच्च शेंगा लक्ष वेधून घेत आहेत.
तब्बल दीड एकरामध्ये भुईमुगाची शेती लावली असून हा भिवंडी तालुक्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी भुईमुगाचे पीक घेण्याचा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक समस्या व साधनांची अनुपलब्धता यावर मात करून भुईमुगाची शेती करणाºया दीपक भोईर यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. माझ्याकडे दोन एकर शेतजमीन आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकºयांचा तुटवडा असल्यामुळे नवीन पीक घेता येईल का, यासाठी यूट्यूबवरून विविध पिकांची माहिती घेतली. त्यानंतर ग्रामसेवकांच्या मदतीने भुईमुगाचे पीक घेतले. या शेतीसाठी १७ ते १८ हजारांचा खर्च आला असून एक लाखांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे भोईर यांनी सांगितले.