ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणास यशस्वी सुरुवात, २३ केंद्रांवर लसीकरण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 06:17 AM2021-01-17T06:17:47+5:302021-01-17T06:18:46+5:30
या वेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत ही लस दिली गेली.
ठाणे : आठ-दहा महिने आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन यंत्रणा कोरोनाशी लढा देत आहे. या आजाराच्या लसीची अनेक महिन्यांपासूनची प्रतीक्षा संपुष्टात येऊन शनिवारी बहुचर्चित कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा सर्वत्र प्रारंभ झाला. त्यानुसार ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीत तिचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी पहिली लस टोचून घेऊन जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा पहिला लाभार्थी होण्याचा मान मिळविला. दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून रोझा गार्डनिया येथे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. वृषाली गौरवार यांनी पहिली लस घेतली.
या वेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत ही लस दिली गेली.
जिल्ह्यातील ६२ हजार ७५० फ्रंटलाइन वर्करसाठी मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला शासनाकडून ७४ हजार कोरोनावरच्या लसी प्राप्त झाल्या. त्यानंतर शनिवारी कोरोनावरील लसीकरण मोहिमेला जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपरिषदा व ग्रामीण क्षेत्रातील २३ लसीकरण केंद्रांवर सुरुवात करण्यात आली.
लसीकरणाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यात एक हजार ८२६ फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली आहे. दरम्यान, त्यानंतर शासनाकडून लसीकरणाबाबत ज्याप्रमाणे सूचना प्राप्त होतील, त्याप्रमाणे लसीकरण पुढे सुरू राहणार आहे, असे सांगण्यात आले.