जेजे मार्ग पोलीस ठाण्यातील 'ते ' यशस्वी योद्धा पुन्हा कर्तव्यावर रुजू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 09:54 PM2020-05-23T21:54:35+5:302020-05-23T21:54:44+5:30
तिघांनी या विषाणूवर यशस्वी मात केल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले होते.उर्वरित सहकारी लवकरच सुखरूप परततील, असा आत्मविश्वास त्यांच्यातून व्यक्त झाला.
मुंबई - एकाच पोलीस ठाण्यात सर्वाधिक जणांना कोरोनाची लागण झालेल्याने बदनाम झालेल्या जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकारी- अंमलदाराची प्रकृती झपाटयाने सुधारत आहे. कोरोनावर यशस्वी मात करीत दोघा अधिकाऱ्यांसह तिघेजण शनिवारी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. ठाण्यातील सर्वांनी टाळ्याच्या गजरात घोषणा देत या योद्धाचे स्वागत केले.
तिघांनी या विषाणूवर यशस्वी मात केल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले होते.उर्वरित सहकारी लवकरच सुखरूप परततील, असा आत्मविश्वास त्यांच्यातून व्यक्त झाला. कोविंड -19 च्या विषाणूच्या अटकावासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलिसांमध्ये या संसर्गाची झपाट्याने लागण होत गेली. तीन आठवड्यापूर्वी दक्षिण मुंबईतील जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील तब्बल 46 जणांना त्याची बाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. गृहमंत्री, पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्याला आणि रुग्णालयाला भेट देऊन अधिकारी, अंमलदार आणि त्याच्या कुटूंबियांची उपचाराबाबतची माहिती घेतली होती. कोरोना पॅझिटिव्ह असलेल्या एक सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक व एका कॉन्स्टेबलची प्रकृतीत झपाटयाने सुधारणा होत गेली. त्याचे रिपोर्ट दोन वेळा निगेटिव्ह आल्याने डॉक्टरानी त्यांना कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केले होते.
घरी थोडे दिवस विश्रांती घेतल्यानंतर तिघेजण शनिवारी पुन्हा पोलीस ठाण्यात रुजू झाले. त्याच्या स्वागतासाठी आवारात रांगोळी काढण्यात आली होती. सर्वजण पोलीस उपायुक्तसह सर्व वरिष्ठ अधिकारी व अंमलदार प्रवेशद्वारात येऊन थांबले होते. तिघांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. सर्वानी त्याच्या ध्येर्याला सलाम करीत त्याचे अभिनंदन केले.