अकस्मात मृत्यूचा बनाव पेल्हार पोलिसांनी उधळला; पतीसह त्याच्या भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 06:08 PM2024-10-18T18:08:44+5:302024-10-18T18:09:11+5:30
हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) : कामण येथे राहणाऱ्या २१ वर्षीय पत्नीचा पोटात दुखत असल्याने मृत्यू झाल्याचा अकस्मात बनाव पेल्हार पोलिसांनी उधळून लावला आहे. पेल्हार पोलिसांनी ही माहिती नायगांव पोलिसांना दिल्यावर त्यांनी गुरुवारी रात्री २४ वर्षीय आरोपी पती व त्याचा ३४ वर्षीय भावाच्या विरोधात हत्या, हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
कामणच्या पाचावीपाडा चाळीत इस्माईल चौधरी (२४) आणि त्याची पत्नी खुर्शीदा चौधरी (२१) हे राहत होते. बुधवारी दुपारी आरोपी पती इस्माईल हा कामावरून तो घरी आल्यावर पत्नीसोबत अन्य एक जण घरात दिसून आला. त्यामुळे त्याचा पारा चढला व त्याने रागाच्या भरात पत्नीचे दुसऱ्या सोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर इस्माईलने नवजीवन परिसरात राहणाऱ्या मुश्ताक चौधरी (३४) या भावाला घरी बोलावले. दोन्ही भावांनी नंतर रात्री तिचा मृतदेह खाजगी वाहनाने नवजीवनला मुश्ताकची घरी घेऊन गेले. रात्री खुर्शीदाचा पुणे येथे राहणाऱ्या भाऊ मोहम्मद शरीफ चौधरीला इस्माईल याने फोन करून पोटात दुखत असल्याच्या कारणावरून मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच दफनविधी उरकून घेऊ का असे विचारल्यावर डॉक्टरकडे किंवा रुग्णालयात घेऊन जा तोपर्यंत पुण्यावरून येत असल्याचे सांगितले. दोघा भावांनी रात्रीच्याच वेळी डी फिर्जर घरी आणून खुर्शीदाचा मृतदेह त्यात ठेवला.
बुधवारी रात्रीच खुर्शीदाचा भाऊ पुण्यावरून नवजीवन येथे आल्यावर त्याला संशय आल्याने तिचा पोस्टमार्टम किंवा पोलिसांना सांगून चौकशी करू असे बोलल्यावर तिचा मृतदेह नालासोपारा येथील मनपा रुग्णालयात घेऊन गेले. नवजीवन परिसरात रात्री काही तरी गडबड झाल्याची माहिती पेल्हार पोलिसांना मिळाली. पण ते नवजीवन येथे पोहचल्यावर मनपा रुग्णालयात गेल्याची माहिती मिळाली. पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे आणि त्यांची टीम मनपा रुग्णालयात पोहचली. तिथे इस्माईल याला चौकशी केल्यावर त्याने पोटात दुखत असल्याने खुर्शीदाचा मृत्यू झाल्याचे खोटे पोलिसांना सांगितले. पोलिसांना खुर्शीदाच्या गळ्यावर निशाण दिसल्याने जे केले त्याची माहिती असल्याचे पोलिसांनी त्याला सांगून विश्वासात घेतल्यावर घडलेली हकीकत सांगून ओढणीने गळा आवळून हत्या केल्याचे सांगितले.
पेल्हार पोलिसांनी दोन्ही भावांना ताब्यात घेऊन हकीकत नायगाव पोलिसांना सांगितले. नायगांव पोलिसांनी मनपा रुग्णालयात येऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेले. खुर्शीदाच्या भावाने तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुरुवारी रात्री आरोपी दोन्ही भावांना अटक केले आहे.