सुधाकर चव्हाण भाजपाच्या वाटेवर?

By admin | Published: January 28, 2017 02:51 AM2017-01-28T02:51:01+5:302017-01-28T02:51:01+5:30

संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत असलेल्या भारतीय जनता पार्टीची महापालिका निवडणुकीत स्वबळावर यश मिळवण्याकरिता आयारामांवर भिस्त आहे

Sudhakar Chavan on the way to BJP? | सुधाकर चव्हाण भाजपाच्या वाटेवर?

सुधाकर चव्हाण भाजपाच्या वाटेवर?

Next

अजित मांडके / ठाणे
संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत असलेल्या भारतीय जनता पार्टीची महापालिका निवडणुकीत स्वबळावर यश मिळवण्याकरिता आयारामांवर भिस्त आहे. वेगवेगळ््या पक्षातील मंडळी येत्या काही दिवसांत पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींचाही समावेश असू शकतो. त्याची बोहनी ‘टाडा’फेम नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या भाजपाप्रवेशाने होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुठल्याच महापालिकेत कुणाशीच युती करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर ठाण्यात एकहाती सत्ता आणण्याचा दावा शिवसेनेने केला आहे. भाजपा दीर्घकाळ युतीमध्ये लढत राहिल्याने त्यांचे संघटन कमकुवत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत इतर पक्षांतील आणखी किती मासे गळाला लागतात, याची वाट भाजपा पहात आहे.
काही वॉर्ड हे शिवसेनेचे बालेकिल्ले असल्याने तेथे भाजपाचे संघटन नाही तर उमेदवार असण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे अशा ठिकाणी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षातील बंडखोरांना उमेदवारी देण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. काही धनाढ्य मंडळींना भाजपाची उमेदवारी देऊन नशिब अजमावून पाहण्याची संधी दिली जाऊ शकते.
मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले ‘टाडा’फेम नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचा भाजपाप्रवेश पक्का मानला जात आहे. युतीच्या वाटाघाटी सुरु होत्या तेव्हा चव्हाण यांच्या भाजपाच्या स्थानिक नेत्यांबरोबर बैठका झाल्याचे बोलले जाते. त्यानंतर चव्हाण यांनी शिवसेनेचा दरवाजा ठोठावून पाहिला. मात्र त्यांनी चव्हाण यांना प्रवेश मिळणार नसल्याचे संकेत दिले. त्यामुळे चव्हाण यांनी काँग्रेस प्रवेशाची चाचपणी केली. त्यातही त्यांना यश न आल्याचे कळते. आता पुन्हा ते भाजपाकडे प्रवेशाची याचना करीत आहेत. चव्हाण यांचे नाव बिल्डर सुरज परमार आत्महत्येच्या प्रकरणात घेतले गेले. चव्हाण यांना अटक झाली होती. भाजपाकडे गृहखाते असल्याने सध्या पुणे, नाशिक, मुंबईपासून अनेक ठिकाणचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक या पक्षात रांगा लावून प्रवेश घेत आहेत. यापूर्वी हीच मंडळी गृहखाते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होती. त्यामुळे चव्हाण यांना गृहखात्याचे कवच हवे आहे तर भाजपाला दोन-तीन वॉर्डांवर प्रभाव असलेल्या चव्हाण यांच्यासारख्या उमेदवारांची गरज आहे. थेट पक्ष प्रवेश देणे अडचणीचे असेल तर आपल्याला भाजपा पुरस्कृत उमेदवार जाहीर करावे, असा चव्हाण यांचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते.

Web Title: Sudhakar Chavan on the way to BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.