साखरेचे भाव स्थिर; पण तीळ, गुळाचे दर वाढल्याने खरेदीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:35 AM2021-01-06T00:35:49+5:302021-01-06T00:39:10+5:30
महागाईमुळे संक्रांतीचा गोडवा यंदा कमी होणार ? गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेक सण उत्सव साजरे करता आले नाही.
स्नेहा पावसकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाची लोकांच्या मनातील भीती आता हळूहळू कमी होत आहे. त्यातच नवे वर्ष नव्या आशा, अपेक्षा घेऊन आले आहे. या नव्या वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांत अगदी आठ दिवसांवर आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झालेली नसली तरी गूळ, साखर, तीळ आणि अन्य वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्या असून साखर वगळता इतर वस्तूंचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे यंदा संक्रांतीचा गोडवा कमी होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेक सण उत्सव साजरे करता आले नाही. मात्र वर्षातला पहिला संक्रांतीचा सण अनेक जण साजरा करतात. महिलांना तर हळदी कुंकू आणि तीळगुळाची आवड. या तीळगुळाची बाजारात विक्री सुरू झाली असून त्याच्या दरातही वाढ झाली आहे. साखरेचे भाव गेल्या महिन्याइतके स्थिर असून तीळगुळाच्या दरामध्ये २० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे.
तिळाचे दर
तिळाचे प्रकार असतात. लाडू, चिक्कीसाठी पाॅलिशचा चांगला तीळ वापरला जातो. त्याचा दर २५०-२६० रुपये किलो आहे. साधे तीळ २०० - २१० रुपये किलो आहेत.
गुळाचे दर
गूळ साधारणपणे अनेक पदार्थांत वापरला जातो. गुळाच्या किमती मात्र गेल्या महिन्यापेक्षा वाढल्या आहेत. साधा गूळ सध्या ७० ते ८० रुपये किलो आहे. चिकीचा गूळ ८० ते १०० रुपये किलो आहे.
साखरेचे भाव
साखरेचे दर गेल्या महिन्याइतकेच स्थिर आहेत. सुदैवाने त्यात सध्या तरी वाढ झालेली नाही. किरकोळ दुकानातही ती ४० ते ४२ रुपये किलो आहे. त्यामुळे सक्रांतीत ग्राहकांना तेवढाच काय तो दिलासा म्हणावा लागेल.
मकरसंक्रांत म्हटली की तिळगुळाशिवाय कोणताच पदार्थ होत नाही. त्यामुळे तीळगूळ लागतोच. परंतु त्याचे वाढलेले दर पाहता यंदा सण जरा आवरता घ्यावा लागेल.
-दिव्याक्षी मांडवकर, गृहिणी
साखरेचे भाव वगळता तीळगुळाचे दर वाढले आहेत. अजून महिलावर्गाकडून फारशी मागणी सुरु झालेली नाही. वाढते दर पाहता तीळगुळासाठी ग्राहक किती येतील, याची खात्री नाही.
-देवीदास चाैहान, किराणा दुकानदार