ऊसाच्या रसाच्या दरात पाच रुपयांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:09 AM2019-05-22T00:09:37+5:302019-05-22T00:36:40+5:30
मुंबई ते कर्जत एकच दर : लहान ग्लास १५, तर मोठा २० रुपये
- जान्हवी मौर्ये
डोंबिवली : ऐन उन्हाळ््यात घामाच्या धारांनी भिजलेल्या डोंबिवलीकरांची तहान भागवणारा व त्यांना दिलासा देणारा ऊसाचा रस पाच रुपयांनी महागला आहे. आतापर्यंत लहान ग्लासाकरिता १० रुपये मोजणाऱ्यांना १५ रुपये तर मोठ्या ग्लासाकरिता १५ रुपये मोजणाऱ्यांना २० रुपये मोजावे लागणार आहेत.
आयुर्वेदांमध्ये ऊसाला ‘रसायन’ असे संबोधले आहे. ऊसाचा रस हा शरीरासाठी फायदेशीर असल्याने त्याला बाराही महिने मागणी असते. उन्हाळ््यात ऊसाच्या रसाची मागणी जास्तच वाढते. यंदा ऊसाचा भावात एक टनामागे दोन हजार रुपयांनी वाढ झाल्याने ऊसाच्या रसाच्या किंमतीत ५ रूपयांनी वाढवल्याचे ऊस-रस विक्रेता संघटनेनी सांगितले.
संघटनेचे सदस्य अशोक शेंडकर यांनी सांगितले की, पूर्वी ४ हजार रूपये टनाने मिळणारा ऊस आता ६ हजार रूपये टन या किमतीने मिळत आहे. त्यामुळे ऊसाच्या रसाच्या दरात वाढ करण्याचा निणर्य घेतला. पाच रूपयांची ही वाढ सहा वर्षांनी केली आहे. कल्याण आणि डोंबिवलीत मिळून १२५ ऊसरस विक्रेते आहेत. या संघटनेचे ४८ विके्रते सदस्य आहेत. दहा वर्षापूर्वी डोंबिवलीत ९८ विक्रेते होते. ही संख्या घटत आहे. ज्या विक्रेत्यांचे वडिलोपार्जित दुकान आहे तेच या व्यवसायात तग धरून आहेत. ज्यांनी जागा भाडेतत्त्वावर घेऊन व्यवसाय सुरू केला होता ते आता व्यवसायातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे विक्रेत्यांची संख्या कमी होत आहे.
ऊसाच्या रसाचा व्यवसाय फेबु्रवारी ते मे या काळातच चांगला चालतो. कधी पाऊस लांबला तर जून महिना हा विके्रत्यांसाठी बोनस असतो. या दिवसांमध्ये चांगला व्यवसाय करून त्यावर वर्षभर गुजराण करावी लागते. इतर महिन्यात व्यवसाय चालतो. पण त्यातून फारसा नफा मिळत नाही. वीज बिल, कर, कामगारांचा पगार या गोष्टीचा विक्रेत्यावर बोजा असतो. ऊसाच्या रसासाठी आम्ही गोटी बर्फाचा वापर करतो. हा बर्फ २० रूपये किलो दराने मिळतो. साधा बर्फ हा ५ रूपये किलो आहे. त्यामुळे किमतीत फरक पडत असला तरी ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे हेच आमचे उद्दिष्ट असते. सिझन नसेल त्याकाळात ४० ते ४५ टक्के व्यवसाय होतो. सिझनमध्ये दिवसाला आठ हजार रूपये ते २० हजार रूपयांपर्यत व्यवसाय होतो. विक्रेत्याला एक दिवसाला कमीत कमी आठ हजार रूपये व्यवसाय होणे गरजेचे आहे. तरच त्याला वर्षभराची गुजराण करणे शक्य होते. कल्याणमध्ये दररोज २८ टन ऊस तर डोंबिवलीत १४ टन ऊस येत असतो, असे त्यांनी सांगितले.
संघटनेचे अध्यक्ष भरत शेंडकर म्हणाले, पूर्वी या व्यवसायासाठी लागणारा ऊस आम्ही आमच्या शेतातील वापरात असे. पण आता १४ टन ऊस आणला तर तो लवकर संपत नाही. त्यामुळे तो ठेवण्यासाठी जागा लागते. पूर्वी १४ टन ऊस चार दिवसांत संपत असे. आता एक दिवसाला ५०० किलो ऊस मुश्कीलीने संपतो. त्यामुळे शेतातील ऊस विकून टाकतो आणि रसासाठी मागणीप्रमाणे ऊस विकत घेतो. रामनवमी पासून ऊसाच्या रसाच्या दरात वाढ केली आहे. ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत याठिकाणच्या विक्रेत्यांनी दोनदा दर वाढ केली होती. प्रथम त्यांनी १० रूपयांचा ग्लास १२ रूपये आणि मोठा ग्लास १५ रूपये केला होता. त्यानंतर लहान ग्लास १५ रूपये आणि मोठा ग्लास २० रूपये केला.
उसाच्या रसामुळे शरीराला होतात फायदे : ऊसाच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमी भरून निघते. त्यातून व्हिटॅमीन ए,बी,सी व के जीवनसत्त्व मिळतात. मुत्राशयाचे विकार दूर होतात. ऊसाच्या रसात लिंबाचा रस टाकून सेवन केल्यास पौष्टिकता आणि स्वाद कुठल्याही कोल्ड्रीकपेक्षा चार पटीने जास्त असतो.