अर्थसंकल्पासाठी सुचवा आपापली ठोस कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:12 AM2018-02-23T02:12:50+5:302018-02-23T02:12:55+5:30
आयुक्त लवकरच स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यात आणखी काही ठोस कामे सुचवायची असतील
कल्याण : आयुक्त लवकरच स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यात आणखी काही ठोस कामे सुचवायची असतील, तर नगरसेवकांनी ती सुचवावी, असे पत्र कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती राहूल दामले यांनी सर्व नगरसेवकांना पाठवले आहे.
गेल्या दोन वर्षातील अर्थसंकल्प पाहिला, तर महापालिकेच्या उत्पन्नात भरीव वाढ झालेली नाही. महापालिका आर्थिक कोंडीत असल्याने त्याचा विकासकामांवर परिमाण झाला. फायली मंजूर झाल्या नाहीत. महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात ३०० कोटीची तूट होती. पुढील वर्षी ती ३३४ कोटींवर जाण्याची शक्यता आयुक्त पी. वेलरासू यांनी आर्थिक स्थितीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल महासभेत सादर करताना मांडली होती.
विकासकामे होत नसल्याने नगरसेवक वैतागले होते. आर्थिक कारणांमुळे विकासकामांची कोंडी होत असल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी आयुक्तांच्या दालनात आंदोलन करुन त्यांची खुर्ची टेबलावर आपटली होती. ही परिस्थिती लक्षात घेता गटारे-पायवाटांचीच कामे होतच राहतील. मात्र प्रत्येक प्रभागात एखादे ठोस काम सुचविल्यास त्याचा प्राधान्याने केला जाईल. महापालिकेच्या अर्थसंकल्पात नगरसेवकाला त्याच्या प्रभागात कामे करण्यासाठी वर्षाला ३५ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला जातो. त्या निधीव्यतिरिक्त नगरसेवकाने ठोस काम सुचविल्यास अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्यात येईल. त्यासाठी आयुक्तांशी विचारविनिमय करुन ठोस कामासाठी निधीही मिळविता येईल, या भावनेतून हे पत्र पाठवण्यात आले आहे. आयुक्त २७ तारखेला स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करतील. त्यात काही बदल सुचवून तो महासभेला पाठविला जाईल. तत्पूर्वी या सूचना मिळाल्यास महासभेला अर्थसंकल्प पाठवण्यापूर्वी त्याचा विचार करता येईल, असे त्यांनी सुचवले आहे.