इमारतीवरुन उडी घेऊन महिलेचा दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न: पोलिसांनी वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:44 PM2019-07-23T22:44:22+5:302019-07-23T22:59:15+5:30
आधी पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार. नंतर त्याच्या अटकेसाठी पोलिसांकडे मागणी. पुन्हा त्याच्या सुटकेसाठी पोलिसांकडे तगादा लावणे अशा अनेक कारणांसाठी तगादा लावणा-या प्रीती केणे या महिलेने मंगळवारी दुसऱ्यांदा एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने सहायक पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविले.
ठाणे : वेगवेगळ्या कारणांमुळे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोरच यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न करणा-या प्रीती त्रिदेव केणे (२४, रा. आंंबिवली, ठाणे) हिने मंगळवारी पुन्हा याच कार्यालयासमोरील पोलीस वसाहतीच्या पाचव्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या इमारतीमधील रहिवासी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी आपला जीव धोक्यात घालून तिचे प्राण वाचविले. तिला सुरुवातीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रीती हिने १७ जुलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर काचेच्या तुकड्याने स्वत:च्या पोटावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही तिला तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाºयांनी अडवून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. याप्रकरणी तिच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. रिक्षाचालक त्रिदेव केणे (३०, रा. खडवली) याच्याबरोबर तिचे सहा महिन्यांपूर्वीच दुसरे लग्न झाले. या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. कौटुंबिक वादातून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरूहोता. यातूनच तिने पती आणि सासू, सासºयांविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामध्ये पतीचे नाव वगळावे, केवळ सासूसासºयांचे नाव फिर्यादीमध्ये ठेवावे, अशी तिची मागणी आहे. तिचा पहिला कायदेशीर घटस्फोट झाला की नाही, याबाबत साशंकता असून, दुसºया विवाहाचीही तिच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. पतीने मात्र ती आपली पत्नी नसल्याचा दावा केल्यामुळे पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला आहे. माझे सासू, सासरे हे पती त्रिदेव याला घेऊन गेले आहेत. त्याला भेटू देत नाहीत. त्यामुळे मला जगायचे नाही, असे म्हणून तिने १७ जुलै आणि त्यापाठोपाठ २३ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील भास्कर या पोलीस अधिकारी वसाहतीमधील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. जिन्याच्या खिडकीतून ती पाचव्या मजल्यावरील सज्जाच्या भागात पोहचली. तिथे पाय खाली सोडून बसल्यामुळे तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांनी त्या भागात उतरुन तिचा जीव वाचविला. त्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.