दिवा-ठाणे प्रवासातही मारहाण, महिनाभरात मारहाणीच्या दोन घटना, पोलिसांचे कारवाईचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 05:56 AM2017-09-15T05:56:08+5:302017-09-15T05:56:20+5:30
कल्याणमधील महिला मारहाण घटनेच्या पार्श्वभूमीवर दिवा-ठाणेदरम्यान महिनाभरात सुरू असलेले मारहाण आणि बाचाबाचीचे सत्र समोर येत आहे. लोकल प्रवासात मारहाणीच्या दोन घटना ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात नोंदवल्या आहेत. दिव्यातील घटना पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर गुरुवारी सकाळी मुंब्रा स्थानकात लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरून महिलांमध्ये बाचाबाची झाली.
ठाणे : कल्याणमधील महिला मारहाण घटनेच्या पार्श्वभूमीवर दिवा-ठाणेदरम्यान महिनाभरात सुरू असलेले मारहाण आणि बाचाबाचीचे सत्र समोर येत आहे. लोकल प्रवासात मारहाणीच्या दोन घटना ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात नोंदवल्या आहेत. दिव्यातील घटना पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर गुरुवारी सकाळी मुंब्रा स्थानकात लोकलच्या दरवाजात उभे राहण्यावरून महिलांमध्ये बाचाबाची झाली. त्या महिलांवर कारवाई करण्याची मागणी प्रवासी महिलांनी केली आहे.
८ आॅगस्ट रोजी दिव्यातील विनायक सोनावणे हे डोंबिवलीवरून सकाळी ७.२९ वाजता सुटलेल्या लोकलमध्ये ७.३८ वाजता दिव्यात सीएसटीकडील पहिल्या मालडब्यात चढले. त्या वेळी भजनी ग्रुप डब्यात भजन गाताना जागा अडवून बसला होता. याचदरम्यान, डब्यात चढलेले एक वयोवृद्ध लटकत उभे होते. त्यांच्याकडे पाहून त्यांना जागा देण्याची विनंती भजनी ग्रुपकडे केली. त्यावेळी ग्रुपमधील काही जणांनी मुंब्रा ते नाहूरदरम्यान मारहाण केल्याचे सोनावणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी त्या संध्याकाळी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन यासंदर्भात तक्रार दिल्यावर अनोळखी चार ते पाच जणांविरोधात अदखलपात्र तक्रार नोंदवली आहे.तसेच याबाबत ठाणे स्टेशन प्रबंधकांकडेही लेखी तक्रार केली आहे. तर, ७ सप्टेंबर रोजी पालघर येथे राहणारे संतोष धोडी हे कुटुंबासह लोकलने प्रवास करताना,त्यांचे कोपर ते ठाणेदरम्यान एकाशी भांडण झाले. त्यावेळी त्या व्यक्तीने आपल्या हातातील लोखंडी कड्याने त्यांना आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. दरम्यान, त्यांनी ठाण्यात उतरून प्रथमोपचार घेऊन प्रबंधक कार्यालयात तक्रार नोंदवली. दोन दिवसांपूर्वी दिव्यातही जागेवरून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तसेच गुरुवारी सकाळी डोंबिवलीवरून ९.२८ वा. सीएसटीकडे जाणारी लोकल ९.३५ ला सुटली. लोकल उशिरा सुटल्याने तिला गर्दी झाली होती. त्यात मुंब्य्राला गाडीच्या लेडिजच्या मधल्या डब्याच्या पहिल्या दरवाजाने महिलांचा एक ग्रुप चढला. त्यांनी आधीच गेटवर उभ्या असलेल्या महिलांवर दादागिरी करून शिवीगाळ केली. याबाबत अपर्णा शहा, श्रावणी गावडे या महिला प्रवाशांनी त्या महिलांवर कारवाई करण्याची मागणी दिवा आरपीएफकडे केली.
‘नागरिकांनी पुढे येऊन माहिती द्यावी’
लोहमार्ग पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दिव्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेची नोंद असून त्याचा तपास सुरू आहे. मात्र, अन्य घटनांची कोणतीच नोंद नाही. जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर नागरिकांनी पुढे यावे. संबंधितांवर तातडीने कारवाई करता येईल.
- उत्तम सोनावणे, पोलीस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग रेल्वे