शेती समृद्ध न झाल्याने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 03:30 AM2017-08-15T03:30:25+5:302017-08-15T03:30:29+5:30

आपल्या देशातील ८० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाने शेतीला दगा दिला आहे.

Suicide due to not being rich in agriculture | शेती समृद्ध न झाल्याने आत्महत्या

शेती समृद्ध न झाल्याने आत्महत्या

Next

डोंबिवली : आपल्या देशातील ८० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाने शेतीला दगा दिला आहे. जोडधंदे विकसित करून शेती समृद्ध करण्याची रचना २५ वर्षांत झालेली नाही. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी व्यक्त केली.
‘चतुरंग प्रतिष्ठान’, डोंबिवली शाखेच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्तसंध्या या कार्यक्रमांतर्गत ‘बातमी अशी सापडते, दिसते, करता येते’ या विषयावर गप्पागोष्टीमय मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी माधवाश्रम मंगल कार्यालयात झाला. या वेळी निरगुडकर बोलत होते. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
निरगुडकर म्हणाले, हवामान बदलत आहे, हमीभाव स्थिर नाही. धरण आहे तिथे पाट नाही, पाट आहे तिथे पाणी नाही, पाणी आहे तिथे बियाणे नाही. सोलापुरात तिसºयांदा पेरणीची वेळ आली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. ते कमकुवत मनाचे आहेत, असे बोलले जाते. पण, त्यांना आशेचा एकतरी किरण दिसला पाहिजे. आज ११४ तालुक्यांत १० टक्के पाऊस नाही. अनेक तालुके ओस पडले आहेत. तेथील नागरिक कसे जगणार. खरीप हंगाम गेला. रब्बी हंगामाचे काही माहीत नाही. ५० ते ६० लोक शेतीवर अवलंबून आहेत. हा प्रश्न सामाजिक प्रतिष्ठेचा आहे. मराठा मोर्चाची शिस्त वाखाणण्याजोगी होती. या मोर्चाची मांडणी खोलवर आहे. एवढे आमदार, खासदार अशी मांडणी करता येणार नाही. एवढी सोपी मांडणी करू नका. यांची मांडणी खोलवर आहे.
प्रत्येक समाजात काळानुसार बदल झाला पाहिजे. आता शेतकरी होणे, हे शाप आहे. शेतकरी दैन्यावस्थेत जगत असतात. इतके दारिद्रय मी कधी पाहिले नाही.
शेतीला लागणाºया पायाभूत सोयीसुविधा जोपर्यंत आपण विकसित करत नाही, तोपर्यंत हा आक्रोश असाच येत राहणार आहे. यामागे अर्थकारण आहे. त्याला कोणताही जातीचा रंग आपण लावू नये, असे आवाहन त्यांनी केले.
मराठा समाज हा लढवय्या आहे. ज्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. लाखालाखांचे मराठ्यांचे मोर्चे निघाले तशी इतर समाजांचीही संमेलने झाली. पाटीदारांची आंदोलने झाली, अशी अनेक उदाहरणे देता येतील. कारण, समाजाची अर्थरचना आणि समाजरचना बदलत गेली. शेतीचे तुकडे झाले आणि शेती अव्यवहार्य झाली, असे ते म्हणाले.
तेच खरे रियल हिरो
चित्रपटातील तारेतारका मला हीरो वाटत नाही. त्यापेक्षा उल्हासनगरमधील प्रांजल पाटील मला रिअल हीरो वाटतात. सैराट चित्रपटात जो मुलगा दाखवला आहे, त्याचे पुढे काय झाले, कोणाला माहीत नाही. पण, सागर रेड्डी नावाच्या मुलाबाबतीत अशीच घटना घडली होती. १८ वर्षांनंतर अनाथालयातून अनुदान मिळत नाही. म्हणून बाहेर पडावे लागते.
महाराष्ट्रात १० हजार मुले अनाथाश्रमातून बाहेर पडतात. त्यांच्या पुढील भवितव्याचे काय? सागरला अनाथालयातून बाहेर पडल्यावर चांगली व्यक्ती मिळाली. त्याने इंजिनीअरचे शिक्षण घेतले. परदेशात जाण्याची संधी आली असूनही ती नाकारली. सागरने वयाच्या ३१ व्या वर्षी ४० मुलींचे कन्यादान केले. हे खरे रिअल हीरो आहेत, असे निरगुडकर यांनी नमूद केले.
बातमीशी प्रामाणिक असावे
वृत्तवाहिन्या बातम्या मनोरंजक करतात, असे आरोप केले जातात. पण, हा माध्यमांचा दोष नाही. प्रेक्षक हे पाहणे बंद करतील, त्या दिवशी वाहिन्या रंजकता बंद करतील. आपण बातमीशी प्रामाणिक असले पाहिजे.
विरोधी पक्ष जेव्हा बातम्या उचलत नाही, तेव्हा ते काम आम्हाला करावे लागते. बातम्या करताना धमक्या येत असतात.
मात्र, आपण त्यांची जाहिरात करायची नसते. हा या क्षेत्राचा साइड इफेक्ट आहे. ते सहन करण्याची शक्ती तुमच्याकडे पाहिजे. वृत्तवाहिन्या नागरिकांना आधार वाटतात, याकडे निरगुडकर यांनी लक्ष वेधले.

Web Title: Suicide due to not being rich in agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.