सातवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या, डोंबिवलीतील घटना; अभ्यासाचा तणाव की हिंदीच्या शिक्षिकेचे दडपण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 04:14 AM2017-11-04T04:14:33+5:302017-11-04T04:14:45+5:30
अभ्यासाच्या ताणामुळे मुस्कान सिंग (१२) या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. येथील मंजुनाथ विद्यालयात इंग्रजी माध्यमात मुस्कान इयत्ता सातवीत शिकत होती.
डोंबिवली : अभ्यासाच्या ताणामुळे मुस्कान सिंग (१२) या विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. येथील मंजुनाथ विद्यालयात इंग्रजी माध्यमात मुस्कान इयत्ता सातवीत शिकत होती.
मुस्कान गुरुवारी शाळेतून घरी आल्यापासून तीची मन:स्थिती ठीक नव्हती. हिंदी विषयात तिला कमी गुणमिळाले होते. त्या तणावात असतानाच तिने आत्महत्या केली असण्याची शक्यता असल्याचे टिळकनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांसह नातेवाइकांनी शाळेतील हिंदी विषयाच्या शिक्षिकेचे तिच्यावर दडपण होते, असा आरोप केला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी शाळेत जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले, पण आरोपांमध्ये प्राथमिक तपासणीनुसार तथ्य नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
गोग्रासवाडी, नामदेवपथ, ओम दत्तगुरू को-आॅप. हाउसिंग सोसायटीत ब्लॉक नंबर ३८ मध्ये ती कुटुंबासमवेत राहत होती. मुस्कानच्या पश्चात तिची आई, वडील, मोठी बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे.
शुक्रवारी शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास रामनगरच्या शिवमंदिर वैकुंठ स्मशानभूमीत मुस्कानच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वर्गातील मैत्रिणींशीही पोलिसांनी बोलण्याचा प्रयत्न केला, पण या प्रकारामुळे त्या घाबरल्या असून चौकशीत अडथळे आल्याने पुढील दोन दिवसांत चौकशी करण्यात येईल, असेही सांगण्यात आले. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून तपासाधिकारी पोलीस निरीक्षक के.बी. चौधरी हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
जगायचे नाही, मरायचे!
मुस्कानने ‘मला जगायचे नाही, मरायचे’ अशी नोट एका वहीत लिहिली असल्याचेही पोलिसांना आढळले आहे. तसेच गुरुवारी तिच्या पाठीवर मारल्याचे व्रण आढळल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यावर तिने खेळताना पडल्याचे कारण दिल्याचे समजले. जी नोट सापडली आहे, ती नेमकी मुस्काननेच लिहिली आहे का? ते अक्षर तिचेच आहे का? त्याचीही खातरजमा टिळकनगर पोलीस करत असल्याचे सांगण्यात आले.
‘मुस्कान मंजुनाथ विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमात सातवीत शिकत होती. त्या शाळेतील हिंदी विषयाची शिक्षिका साधारण दोन महिन्यांपूर्वी ओरडली होती. तेव्हादेखील मुस्कानची आई शाळेत गेली होती. त्यावेळी शिक्षकांना ती भेटली होती. कोणी रागावले तर फार मनावर घेते, तिला ओरडू नका, अशी विनंती केली होती. मात्र, गुरुवारीही मुस्कानला हिंदीमध्ये ५० पैकी १८ मार्क पडल्याने त्या शिक्षिकेने मुख्याध्यापिकेकडे नेले होते. त्या तणावाखाली मुस्कान होती.’
- विजय सिंग, मुस्कानचे वडील